Sharad Pawar: ‘बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना दिलेला शब्द पाळला होता, सेना विश्वासार्ह पक्ष’, पवारांकडून कौतुकाचा वर्षाव

मुंबई तक

• 12:26 PM • 10 Jun 2021

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची राजधानी दिल्लीत भेट झाल्यापासून राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मात्र, शिवसेनेचं (Shiv Sena) तोंड भरून कौतुक केलं आहे. एवढंच नव्हे तर बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी इंदिरा […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची राजधानी दिल्लीत भेट झाल्यापासून राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मात्र, शिवसेनेचं (Shiv Sena) तोंड भरून कौतुक केलं आहे.

हे वाचलं का?

एवढंच नव्हे तर बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांना दिलेला शब्द कसा पाळला याचा सविस्तर किस्सा देखील त्यांनी यावेळी सांगितला. तसंच यावेळी राज्यातील महाआघाडीचं सरकार पाच वर्ष टिकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 22 वा स्थापना दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

पाहा शरद पवार नेमकं काय-काय म्हणाले:

‘त्या वावड्यांना काहीही अर्थ नाही…’

‘आज इथे आपण एका वेगळ्या विचाराचं सरकार स्थापन केलं आहे. पहिले कुणाला कल्पनाही नव्हती की, आपण आणि शिवसेना एकत्र काम करु. पण आपण पर्याय दिला आणि सुदैवाने तो पर्याय लोकांनी स्वीकारला. आज आघाडीचं सरकार उत्तम रितीने काम करत आहे.’

‘कोणी काहीही म्हणो. मला आठवतंय की, जेव्हा हे सरकार बनलं तेव्हा माध्यमांमध्ये सातत्याने चर्चा होती की, हे सरकार किती महिने टिकेल. पण आता कुणी यासंबंधी चर्चा करत नाही. काल-परवा काहीशी चर्चा झाली. पण मला काही त्याची काही काळजी वाटत नाही.’

‘पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा झाली यामुळे महाराष्ट्रात काही लोकांनी बऱ्याच वावड्या उठवल्या. पण त्याला काहीही अर्थ नाही.’ असं शरद पवार म्हणाले.

महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत चिंता नाही-शरद पवार

‘शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष’

‘मगाशी मी सांगितलं की, आम्ही काही शिवसेनेसोबत याआधी काम केलेलं नव्हतं. पण महाराष्ट्र शिवसेना या पक्षाला अनेक वर्षापासून पाहत आला आहे. त्यामुळे माझा या पक्षाबाबत असा अनुभव आहे की, हा विश्वास असणारा पक्ष आहे.’

Shivsena-BJP: वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची-संजय राऊत

‘बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना दिलेला शब्दही पाळला होता’

‘एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. ज्यावेळी देशात जनता पक्षाचं सरकार आलं आणि त्यानंतर निवडणुकीचा जो कालखंड आला त्यावेळी सगळीकडे काँग्रेसचा पराभव झालेला असताना अशा स्थितीत काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी एक राजकीय पक्ष पुढे आला तो राजकीय पक्ष म्हणजे शिवसेना.’

‘हा पक्ष फक्त पुढेच आला नाही तर त्यांनी असा निर्णय घेतला की, या निवडणुकीत इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी शिवसेना एक सुद्धा उमेदवार विधानसभेला उभा करणार नाही. तुम्ही कल्पना करा विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि पक्षाचा नेता असा निर्णय घेतो की, आम्ही निवडणूकच लढवणार नाही. त्या नेत्याची स्थिती काय होईल?’

‘पण त्याची चिंता कधी बाळासाहेब ठाकरेंनी बाळगली नाही. त्यांनी शब्द दिला होता इंदिरा गांधींना. तो त्यांनी निवडणूक न लढवता तो त्याठिकाणी पाळला. हा इतिहास आजही विसरता येत नाही.’

‘त्यामुळे कोणी काहीही शंका घेतली तरी शिवसेना ज्या पद्धतीने त्या कालखंडात भक्कमपणाची भूमिका घेतली ती भूमिका सोडण्याबाबत शिवसेना निर्णय घेईल असे कुणी अडाखे बांधत असतील ते वेगळ्या नंदनवनात राहतात एवढंच मी सांगू इच्छितो.’

‘हे सरकार टिकेल.. पाच वर्ष कामही करेल. तसंच फक्त हे सरकार टिकणार नाही तर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अधिक जोमाने एकत्रित काम करतील.’ असं म्हणत शरद पवार यानी शिवसेनेचं कौतुक तर केलंच मात्र, या सरकारला कोणताही धोका नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

सहकाऱ्यांच्या कष्टांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसने 22 वर्षे पूर्ण केली-शरद पवार

‘सत्ता भ्रष्ट व्हायची नसेल तर ती अधिक लोकांच्या हातामध्ये गेली पाहिजे’

दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवार यांनी असंही म्हटलं की, सत्ता ही अधिक लोकांच्या हातात गेली पाहिजे.

‘शेवटी सत्ता ही अधिक हातामध्ये गेली पाहिजे. सत्ता ही एकाच ठिकाणी राहिली तर ती भ्रष्ट होते. सत्ता भ्रष्ट व्हायची नसेल तर ती अधिक लोकांच्या हातामध्ये गेली पाहिजे. हे सूत्र आपल्याला मान्य असेल तर समाजातील प्रत्येक घटकाला जाणवेल की, आपण सत्तेत आहोत.’

‘याची काळजी आपण घेतली पाहिजे. मला खात्री आहे हे जेव्हा आपण अधिक जोमाने करु तेव्हा लोकांचा पाठिंबा आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही.’ असं पवार यावेळी म्हणाले.

    follow whatsapp