देशात कोरोनाचे रूग्णांचा आकडा वाढतोय. बॉलिवूडवरही कोरोनाचं सावट दिसून येतंय. अनेक बॉलिवूड कलाकारांना कोरोनाने विळखा घातला आहे. यामध्येच आता प्रख्यात संगीत दिग्दर्शक बप्पी लहरी यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. बप्पी लहरी यांच्या मुलीने यासंदर्भात माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
बप्पी लहरी यांची मुलगी रेमा लहिरी बन्सल यांच्या माहितीनुसार, “बप्पी दा यांना कोरोनाची सौम्य लक्षणं आढळून आली आहेत. त्यांचं वय पाहता खबरदारी म्हणून त्यांना ब्रीच कँडी रूग्णालयामध्ये डॉ. उडवाडिया यांच्या देखरेखीखाली अडमीट करण्यात आलं आहे. ते बरे होऊन लवकरच घरी परततील.”
गेल्या काही दिवसांमध्ये बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. यामध्ये अभिनेता आमिर खान, आर माधवन, मिलिंद सोमण, विक्रांत मसी यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती आहे. त्यानंतर आता बप्पी लहरी यांनाही कोरोनाची लागण झाली असून रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
सिनेसृष्टीवर कोरोनाचं सावट; प्रसिद्ध संगीतकार डॉ. सलील कुलकर्णींना कोरोनाची लागण
दरम्यान महाराष्ट्रात बुधवारी ३९ हजार ५४४ नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. कोरोना रूग्णांच्या संख्येचा आलेख हा गेल्या काही दिवसांपासून चढताच आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू शकतो अशी स्थिती आहे. दिवसभरात २३ हजार ६०० रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण २४ लाख ७२७ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण हे फेब्रुवारी महिन्याआधी ९१ किंवा ९२ टक्क्यांवर होते जे आता ८५.३४ टक्के इतके झाले आहे. राज्यात दिवसभरात २२७ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा सध्या १.९४ टक्के इतका झाला आहे.
ADVERTISEMENT