दुष्काळावर बीडच्या शेतकऱ्याचा जगात भारी पर्याय! दीड एकर जमिनीवर 10 कोटी लिटर पाणी क्षमतेची विहिर

मुंबई तक

• 09:11 AM • 11 Feb 2022

सततचा दुष्काळ अन अवकाळी अतिवृष्टी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पूजलेलं आहे. यामुळं इथला शेतकरी नेहमी अस्मानी अन सुलतानी संकटात पिचला जातो. मात्र या नेहमीच्या दुष्काळी परस्थितीवर मात करण्यासाठी, एका शेतकऱ्याने जगात भारी पर्याय शोधला आहे. तब्बल दीड एकर शेतामध्ये 2 कोटी रुपये खर्च करून विहीर बनवलीय. यामुळं आता 3-4 वर्ष जरी पाऊस झाला नाही, तरी […]

Mumbaitak
follow google news

सततचा दुष्काळ अन अवकाळी अतिवृष्टी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पूजलेलं आहे. यामुळं इथला शेतकरी नेहमी अस्मानी अन सुलतानी संकटात पिचला जातो. मात्र या नेहमीच्या दुष्काळी परस्थितीवर मात करण्यासाठी, एका शेतकऱ्याने जगात भारी पर्याय शोधला आहे. तब्बल दीड एकर शेतामध्ये 2 कोटी रुपये खर्च करून विहीर बनवलीय. यामुळं आता 3-4 वर्ष जरी पाऊस झाला नाही, तरी जवळपास 50 एकरवर बागायती शेती होऊ शकते. दुष्काळी जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रात सर्वात मोठी विहीर म्हणून या विहिरीची नोंद झाली आहे.

हे वाचलं का?

बीडच्या गेवराई तालुक्यात असणाऱ्या, पाडळसिंगी गावचे शेतकरी मारोती बजगुडे. शेतकरी मारोती बजगुडे यांच्याकडे 12 एकर शेती आहे. सोबतच त्यांचा मंडपाचा व्यवसाय असून सतत दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पन्नात घट होत असल्याने, बारामाही पाणी पुरेल अशी काही तरी योजना आखण्याचे त्यांच्या डोक्यात होते. शेततळ्याचा विचार केला मात्र त्यामध्ये मर्यादीत पाणीसाठा राहतो, त्यामुळे त्यानी आपल्या दीड एकर शेतामध्ये विहीर करण्याचे ठरवले.

शेतात विहिर तयार करण्यासाठी काही अडचणी आल्या. मात्र त्यावर यशस्वीपणे मात करत, मारोती बजगुडे यांनी तीन वर्षांपूर्वी ही विहीर खोदण्यासाठी सुरूवात केली होती. सुरूवातीला या विहिरीतून निघालेला मुरूम त्यांनी महामार्गासाठी दिला. त्यातून त्यांना 15 ते 20 लाख रूपये मिळाले. काहीही झाले तरी मागे हटायचे नाही. हा निश्चय मनाशी धरून त्यांनी काम सुरू केले. खोदकाम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी साडेपाच परस खोलवरून सिमेंटने सर्व बाजूने कडे टाकले. यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून, दररोज 80 मजूर यासाठी काम करीत होते. तर 10 हायवा यातील माती आणि दगड काढण्यासाठी लावण्यात आल्या होत्या. अखेर ही विहीर पूर्ण झाली असून या विहीरीसाठी जवळपास दोन कोटींचा खर्च झाल्याचे बजगुडे यांनी सांगितले.

या अवाढव्य विहीरीत 10 कोटी लिटर पाणी साठण्याची क्षमता आहे. लांबून पाहिल्यानंतर या ठिकाणी एखादे धरण किंवा तलाव असल्याचा भास होतो.अशा प्रकारची ही विहीर असून महाराष्ट्रात ती एकमेव ठरण्याची शक्यता आहे. मारोतीराव बजगुडे यांना असलेल्या 12 एकर शेतीपैकी 8 एकरमध्ये त्यांनी मोसंबीची लागवड केली आहे. तसेच या विहीरीमध्ये माशांचे बीजारोपण करण्यात आले असून या माध्यमातून उत्पन्न वाढविण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. तसेच या विहिरीमुळे भविष्यातील शेतीच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे. ही विहिर महाराष्ट्रातली एकमेव मोठी विहिर ठरण्याची शक्यता आहे.

बीड जिल्ह्यात कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. शेतात होत्याचं नव्हतं होतं, त्यामुळे सततच्या दुष्काळावर तोडगा काढताना, मारुती बजगुडे या शेतकऱ्यांने तब्बल दोन कोटींची दीड एकर शेतामध्ये विहिर खोदली आहे. त्यामुळे आता ही विहीर बीड जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली असून महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या स्वरूपाची ही पहिलीचं विहीर असण्याची नोंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी मारुती बजगुडे यांनी दुष्काळावर जगात भारी पर्याय शोधला आहे असं म्हटलं तर वावाग ठरणार नाही.

    follow whatsapp