बंगळुरु : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भारत जोडो यात्रा या दोन ट्विटर हॅन्डेलवर बंगळुरु न्यायालयाने मोठी कारवाई केली आहे. एमआरटी म्युझिक कंपनीने केलेल्या कॉपीराईटच्या दाव्यानंतर बंगळुरु न्यायालयाने हे दोन ट्विटर हॅन्डेल तात्पुरत्या स्वरुपात ब्लॉक करण्याचे आदेश ट्विटरला दिले आहेत. काँग्रेसचे अधिकृत ट्विटर हॅन्डेल आणि भारत जोडो यात्रा ऐन मध्यावर असताना या यात्रेचं ट्विटर हॅन्डेल ब्लॉक करण्याचा आदेश पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
ADVERTISEMENT
काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी काँग्रेसची भारत जोडो यात्रा कर्नाटकमध्ये असताना एक व्हिडिओ चर्चेत आला होता. या व्हिडीओमध्ये KGF-2 या सुपरहिट चित्रपटातील गाण्याचा वापर करण्यात आला होता. मात्र याबाबत KGF-2 ची गाणी बनवणाऱ्या बंगळुरूस्थित एमआरटी म्युझिक कंपनीनं काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतरांविरोधात कॉपीराइट उल्लंघनाची तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, कंपनीच्या तक्रारीवरुन दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी, सुप्रिया श्रीनाटे, जयराम रमेश या नेत्यांविरोधात कॉपीराइट उल्लंघनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कंपनीनं तक्रारीत म्हटलं की, KGF-2 मधील गाण्यांचं कॉपीराइट त्यांच्याकडे आहे. कंपनीनं सर्व भाषांमधील गाण्यांच्या कॉपीराइटसाठी मोठी रक्कम गुंतवली आहे. त्यामुळे कोणीही त्याचा वापर करू शकत नाही.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, काँग्रेसनं त्यांच्या परवानगीशिवाय चित्रपटातील गाण्यांचा वापर राहुल गांधी आणि त्यांच्या भारत जोडो यात्रेचं मार्केटिंग व्हिडिओ बनवण्यासाठी केला आहे. यानंतर आज बंगळुरु न्यायालयाने कंपनीच्या दाव्याचा विचार करत दोन्ही ट्विटर हॅन्डेल तात्पुरत्या स्वरुपात ब्लॉक करण्याचे आदेश ट्विटरला दिले आहेत.
ADVERTISEMENT