मुंबई: भाजप (BJP) खासदार प्रीतम मुंडे (MP Pritam Munde) यांना मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले मुंडे समर्थक हे मंगळवारी मुंबईतील (Mumbai) वरळी येथील कार्यालय परिसरात जमा झाले होते. यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) अतिशय आक्रमक स्वरुपाचं असं भाषण केलं. पण याच भाषणात त्यांनी काही गोष्टी न बोलूनही आपल्या विरोधकांपर्यंत पोहचवल्या आहेत. त्यांच्या याच न केलेल्या भाषणाचा आता आपण या लेखातून नेमका अर्थ समजवून घेणार आहोत.
ADVERTISEMENT
-
पंकजा मुंडेंनी आपल्या भाषणात धर्मयुद्ध, शल्य, कर्ण अशा अनेक उपमा दिलेल्या आहेत. हे महाभारत नक्की कोणत्या दिशेने चाललं आहे आणि पंकजा मुंडे यांना काय म्हणायचं आहे यातील काही गोष्टी अगदीच स्पष्ट आहेत. पंकजा मुंडे या जरी असं म्हणत असतील की, माझं भांडण पक्षाशी नाही, मी नाराज नाही. पण दोन गोष्टीमधून चित्र स्पष्ट होतं.
-
एक म्हणजे पंकजा मुंडे यावेळी असं म्हणाल्या की, माझे नेते नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा आहेत. यावेळी त्यांनी राज्यातील कोणत्याही नेत्याचं नाव घेतलं नाही. आज महाराष्ट्रात भाजपचे सर्वोच्च नेते कोण आहेत हे पंकजा मुंडे यांनाही माहिती आहे आणि अवघ्या महाराष्ट्राला देखील ते ठावूकच आहे. त्यामुळे त्यांचा रोख कोणाकडे होता हे आता स्पष्टच आहे.
-
पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं की, ‘मला शेवटच्या क्षणी कळवलं की, विधान परिषद देता येणार नाही.. मी थँक्यू म्हणाले आणि फोन ठेऊन दिला. नंतर मला वाटलं होतं की, राज्यसभा दिलं जाईल पण भागवत कराडांना दिली. त्यामुळे मी वारंवार सामंजस्याची भूमिका घेतली आहे.’ म्हणजेच पंकजा मुंडे यांना काही प्रमाणात पक्षाकडून आशा होती.
-
पंकजा मुंडे यांनी महाभारतातील जवळजवळ सर्वच उपमा यावेळी वापरल्या आहेत. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की, पंकजा मुंडे या थेटपणे बोलत नाहीत. पण आज त्यांनी अनेक गोष्टी थेटपणे मांडल्या आहेत.
-
यावेळी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या असं म्हणाल्या की, ‘मला मुख्यमंत्री व्हायचंय हे मी कधीही म्हटलं नव्हतं. पण काही जण म्हणतात की, मला पंतप्रधान व्हायचंय.. ते चालतं का?’ असं म्हणताना पंकजा मुंडे यांचा सूर अगदी टीपेला पोहचला होता. यावेळी त्या अत्यंत चिडलेल्या दिसून आल्या. त्यामुळे पंकजा मुंडे यांचा संपूर्ण रोख हा एका नेत्याकडेच होता का? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही पंकजा मुंडेच्या भाषणात मिळाली आहेत.
-
धर्मयुद्धाबाबत बोलताना पंकजा मुंडे यांचा रोख थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर असेल पण अर्थातच त्यांनी त्यांचं नाव घेतलेलं नाही. पण आपल्याला पुन्हा एकदा मुंडे विरुद्ध फडणवीस असा संघर्ष आगमी काळात पाहायला मिळू शकतो.
-
पंकजा मुंडे यांनी आतापर्यंत आपली पक्षात कुचंबणा झाली असल्याचंच आपल्या भाषणातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, असं असलं तरी आपण तात्काळ बंड करणार नाही हे देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडें यांनी एक प्रकारे पक्षाला थेट इशारा दिला आहे.
-
सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये राज्यसभेच्या काही जागा रिक्त होणार आहेत. त्यामुळे तोपर्यंत पंकजा मुंडे या नक्कीच वाट पाहतील. तेव्हा जर त्यांचा विचार झाला नाही तर त्यापुढे त्या काय करतील हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. पंकजा मुंडे यांनी आता दबाव तंत्राचा वापर सुरु केला आहे आणि आता पुढील घडामोडींची त्या वाट पाहत आहेत.
Pankaja Munde BJP: ‘कुणी म्हणतं मला पंतप्रधान व्हायचं आहे, ते चालतं का?’ पंकजा मुंडेंचा फडणवीसांना टोला?
पंकजा मुंडे या महत्त्वाच्या नेत्या आहेत. गोपीनाथ मुंडे यांचं निधन झाल्यानंतरही पंकजा मुंडे यांनी भाजपमध्ये स्वत:चं असं एक नेतृत्व तयार केलं. ते अजूनही त्यांच्या समर्थकांच्या रुपाने आपल्याला दिसतंच आहे. पंकजा मुंडे यांनी धर्मयुद्धाच्या घोषणा केली आहे. त्यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये राज्यसभेच्या काही जागा खुल्या होणार आहेत ती जागा पंकजा मुंडे यांना मिळते की नाही मिळते यावर पुढील अनेक गणितं अवलंबून असणार आहे.
ADVERTISEMENT