भंडारा बलात्कार प्रकरण, दोन पोलीस अधिकारी निलंबित

मुंबई तक

08 Aug 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:11 AM)

भंडारा सामूहिक बलात्कार प्रकरणात दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. लाखनी पोलीस स्थानकाचे एक पोलीस निरीक्षक आणि एक एएसआय अशा दोघांचं निलंबन करण्यात आलं आहे. भंडारा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी मुंबई तकलाही माहिती दिली आहे. बलात्कार पीडित महिलेल्या प्रकरणात हयगय केल्याप्रकरणी निलंबन केल्याची माहिती मतानी यांनी दिली आहे. भंडाऱ्यात मदतीच्या बहाण्याने महिलेवर सामूहिक […]

Mumbaitak
follow google news

भंडारा सामूहिक बलात्कार प्रकरणात दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. लाखनी पोलीस स्थानकाचे एक पोलीस निरीक्षक आणि एक एएसआय अशा दोघांचं निलंबन करण्यात आलं आहे. भंडारा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी मुंबई तकलाही माहिती दिली आहे. बलात्कार पीडित महिलेल्या प्रकरणात हयगय केल्याप्रकरणी निलंबन केल्याची माहिती मतानी यांनी दिली आहे.

हे वाचलं का?

भंडाऱ्यात मदतीच्या बहाण्याने महिलेवर सामूहिक बलात्कार; नागपुरात उपचार सुरू, प्रकृती गंभीर

काय आहे भंडारा सामूहिक बलात्कार प्रकरण?

भंडारा येथील बलात्कार पीडितेवर एकदा नाही तर दोन वेळा सामूहिक बलात्कार झाला. पीडित महिला पतीपासून विभक्त झाली होती. गोंदिया या ठिकाणी तिच्या बहिणीकडे आली होती. ३० जुलैला बहिणीसोबत तिचं भांडण झालं. त्यानंतर तिने रात्रीच्या सुमाराला बहिणीचं घर सोडलं.ती गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात असलेल्या कमरगाव या ठिकाणी आईकडे जाण्यासाठी निघाली. रस्त्यात भेटलेल्या अज्ञात आरोपींनी घरी सोडण्याच्या बहाण्याने तिला कारमध्ये बसवलं. मात्र तिला त्यांनी घरी सोडलं नाही. गोंदियातील मुंडीपार जंगलात नेऊन या महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. ३१ जुलैलाही तिला पळसगाव जंगलात नेण्यात आलं आणि तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

या धक्कादायक घटनेनंतर पीडित महिला जंगलातून निघून भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यात असलेल्या धर्मा ढाब्यावर पोहचली. तिथे दुचाकी दुरूस्त करणाऱ्या आरोपीसोबत तिची भेट झाली. त्यानेही घरी सोडण्याच्या बहाण्याने या महिलेवर पाशवी बलात्कार केला.

पोलिसांवर नेमका आरोप काय होतो आहे?

एकट्या फिरणाऱ्या पीडिताला पाहून मुरमाळी येथील पोलीस पाटील महिलेने तिची विचारपूस केली. त्यानंतर तिची अवस्था पाहून ११२ या क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना बोलावलं. लाखनी पोलिसांनी पीडितेला लाखनी पोलीस ठाण्यात नेलं. तिथे तिची चौकशी केली. वास्तविक तिची अवस्था पाहून पोलिसांनी तिला रूग्णालयात दाखल करणं अपेक्षित होतं. मात्र पोलिसांनी तसं केलं नाही. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जर या महिलेला रूग्णालयात दाखल केलं असतं तर तिच्यावर पुन्हा बलात्कार झाला नसता. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात हयगय केल्याचा आरोप झाला.

या प्रकरणी पोलिसांचं म्हणणं असं आहे की पीडिता रात्री १० वाजता नाही तर पहाटेच्या सुमारास नजर चुकवून बाहेर पडली. पोलीस जरी हे म्हणत असले तरीही अत्याचारग्रस्त महिला पोलीस ठाण्याबाहेर कशी गेली हा प्रश्न उरतोच. ती बाहेर पडली कारण तिच्या तक्रारीकडे लक्ष दिलं गेलं नाही तसंच तिला रूग्णालयातही नेलं गेलं नाही असा आरोप होतो आहे. त्यामुळे आता लाखनी पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित कऱण्यात आलं आहे.

    follow whatsapp