एकनाथ शिंदे गटामधून संजय राठोड यांना मंत्रिपद दिल्यापासून विविध स्तरावरून प्रतिक्रिया यायला सुरु झाल्या आहेत. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी संजय राठोड यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता पुन्हा त्यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. यावरून टीका होत आहे. भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील संजय राठोड यांना मंत्रिपद देणं अत्यंत दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र, यावरून आता चित्रा वाघ यांना भूमाता ब्रिगडच्या तृप्ती देसाई यांनी डिवचलं आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाल्या तृप्ती देसाई?
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांना जबाबदार धरून भाजपने पुढाकार घेत संजय राठोड यांचा राजीनामा मागितला होता. चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाणच्या मृत्यूला संजय राठोड कारणीभूत असल्याचा आरोप केला होता. मात्र आज त्याच संजय राठोड यांना मंत्री बनवलं आहे, पहिल्या रांगेत स्थान दिलं आहे तर चित्रा वाघ यांना आमंत्रण सुद्धा नव्हतं, तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत. ‘चित्रा ताई, तुम्हाला खरंच पूजा चव्हाणला न्याय मिळवून द्यायचा असेल आणि खरोखरच संजय राठोडांना तुमचा विरोध असेल तर पदाचा राजीनामा द्या, असा सल्लाच तृप्ती देसाईंनी चित्रा वाघ यांना दिला आहे.
राजीनामा दिला तरच सर्व सामान्यांना वाटेल की, तुम्ही संजय राठोडांच्या विरोधात आहेत, असं देखील तृप्ती देसाई म्हणाल्या. तुम्ही म्हणतात ना लढू आणि जिंकू तर तुम्ही लढा आणि जिंका पण भाजपमध्ये राहून ते शक्य होणार नाही. कारण तुमच्याच पार्टीने त्यांना मंत्रिपद दिले आहे, असं देसाई म्हणाल्या. याचसह तृप्ती देसाई यांनी एकही महिला आमदाराला मंत्रीपदाची संधी दिली नाही, यावरून खंत व्यक्त केली.
संजय राठोड यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर चित्रा वाघ काय म्हणाल्या?
चित्र वाघ यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून भूमिका स्पष्ट केली आहे. त्या आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, ‘पुजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. लडेंगे….जितेंगे. अशी फेसबुक पोस्ट चित्र वाघ यांनी लिहली आहे.
काय आहे पूजा चव्हाण प्रकरण?
पुण्यात वास्तव्य करणाऱ्या पूजा चव्हाण या मुलीने आत्महत्या केली होती. त्यानंतर तिच्या आत्महत्येचं प्रकरण सोशल मीडिया, प्रसारमाध्यमं सगळीकडेच गाजलं. पूजा चव्हाण ही सोशल मीडियावर बरीच Active होती कारण ती टिकटॉक स्टार होती. तिच्या मृत्यूनंतर सुमारे 12 ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आणि त्यानंतर भाजपने संजय राठोड यांच्यावर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. चित्रा वाघ यांनी यादरम्यान संजय राठोड यांच्या विरोधात मोर्चा खोलला होता. अखेर या प्रकरणामुळे संजय राठोड यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता पुन्हा त्यांची शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदी वर्णी लागली आहे.
ADVERTISEMENT