मुंबई: दहीहंडीच्या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. आज राज्यात श्रीकृष्ण जयंतीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे, उद्या दहीहंडी साजरी केली जाणात आहे. यासाठी गोविंदा पथकांनी जोरदार तयारी केली आहे. याचनिमित्ताने शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मानवी मनोरे उभारताना जर कोणाचा मृत्यू किंवा दुखापत झाल्यास त्यांना मुंख्यमंत्री सहायचा निधीतून आर्थिक मदत करण्यात येणार आहे. मृत्यू झालेल्या गोविंदांच्या वारसाला १० लाखांची मदत करण्यात येणार असल्याची जाहीर केले आहे. या विषयावर आज विधिमंडळात चर्चा देखील झाली आहे.
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदेंनी केल्या दोन मोठ्या घोषणा
दहीहंडीमधील गोविंदांना इथून पुढे खेळाडूंचा दर्जा दिला जाणार आहे. तसेच या सर्व गोविंदांना बाकी खेळाडूंना ज्या सुविधा मिळतात त्या सर्व सुविधा लागू होणार आहेत. त्यांना सरकारी नोकरीमध्ये ५ टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. ज्याप्रमाणे राज्यात प्रो-कब्बडी, प्रो-कुस्ती स्पर्धा घेतल्या जातात त्याप्रमाणे प्रो- गोविंदा स्पर्धा देखील घेतल्या जाणार असल्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केली आहे.
मृत व जखमी गोविंदांना मिळणार आर्थिक मदत
पथकातील गोविंदांचा दहीहंडी फोडण्यासाठी थर लावताना खाली पडून मृत्यू झाल्यास कायदेशीरित्या बाबींनुसार संबंधित वारसाला दहा लाख रुपये देण्यात येणार आहेत. दहीहंडीच्या थरावरुन प्रत्यक्ष पडून दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात, दोन्ही पाय अथवा कोणतेही महत्त्वाचे दोन अवयव निकामी झाल्यास त्याला ७ लाख ५० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. दहीहंडीच्या थरावरुन पडल्याने एक हात किंवा एक पाय किंवा कोणताही एक महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास त्याला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असल्याचं आज जाहीर करण्यात आलं आहे.
महत्त्वाचं म्हणजे हा आदेश या वर्षासाठी लागू होणार असणार आहे. दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांचा विमा देखील उतरवण्यात येणार आहे परंतु त्याचा निर्णय स्वतंत्रपणे घेतला जाणार आहे. दहीहंडी उत्सव उद्याच असल्याने कालवधी कमी आहे त्यामुळे विमा तपासून तो लागू करण्यासाठी वेळ लागेल म्हणून आर्थिक सहायता निधीची घोषणा करण्यात आली आहे.
खालील अटी व शर्तींचे पालन करावे लागणार
आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी अटी व शर्ती लागू आहेत. दहीहंडीसाठी स्थानिक परवानग्या असणे गरजेचे आहे. न्यायालय, प्रशासन व पोलीस यंत्रणेकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांचे आयोजक संस्था तसेच गोविंदा पथकांना पालन करावे लागणार आहे. गोविंदांच्या सुरक्षेची सर्व काळजी संस्थांनी घेतलेली असावी. त्याचप्रमाणे पथकातील सदस्यांनी औपचारिक किंवा अनौपचारिक प्रशिक्षण घेतलेले असावे. मानवी मनोरे तयार करण्याव्यतिरिक्त अन्य कारणांमुळे अपघात किंवा दुर्घटना झाल्यास सदर आर्थिक सहाय्य मिळणार नाही.
गोविंदांच्याबाबतीत वयोमर्यादेचे पालन करणे आवश्यक आहे. १८ वर्षाखालील सहभागी गोविंदांना आर्थिक सहाय्य मिळणार नाही. मानवी मनोरे रचताना अपघात झाल्यास गोविंदांना तात्काळ वैद्यकीय मदतीची कार्यवाही आयोजकांनी स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने करणे गरजेचे आहे. मनोरे रचताना झालेल्या अपघाताबाबत आयोजकांनी तात्काळ स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणेकडे लगेच अहवाल देणे आवश्यक आहे.
ADVERTISEMENT