बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवली : बेल्हेच्या बाजारात बैलांच्या किंमतीत वाढ

मुंबई तक

• 02:26 PM • 20 Dec 2021

– स्मिता शिंदे, जुन्नर प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील बैलगाडा शर्यतींवर घातलेली बंदी उठवल्यानंतर सर्व शेतकरी आणि बैलगाडा मालकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. गेल्या ७ वर्षांपासून राज्यातले विविध नेते या विषयावर न्यायालयीन लढा देत होते. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतींचं मोठं अर्थकारण असतं. परंतू मधल्या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ही सर्व व्यवस्था कोलमडली होती. परंतू बंदी उठवल्यानंतर […]

Mumbaitak
follow google news

– स्मिता शिंदे, जुन्नर प्रतिनिधी

हे वाचलं का?

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील बैलगाडा शर्यतींवर घातलेली बंदी उठवल्यानंतर सर्व शेतकरी आणि बैलगाडा मालकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. गेल्या ७ वर्षांपासून राज्यातले विविध नेते या विषयावर न्यायालयीन लढा देत होते. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतींचं मोठं अर्थकारण असतं. परंतू मधल्या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ही सर्व व्यवस्था कोलमडली होती.

परंतू बंदी उठवल्यानंतर पुन्हा एकदा या अर्थकारणाला सुगीचे दिवस आल्याचं पहायला मिळतंय. जुन्नर तालुक्यीतल बेल्हे या गावात भरणाऱ्या सर्वात मोठ्या बैल बाजारात बैलांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली पहायला मिळाली.

बैलगाडा शर्यतींमध्ये खिलार जातीच्या बैलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. घाटात जोरात पळू शकणारे हे बैल प्रत्येक बैलगाडा मालक वाट्टेल ती किंमत मोजून विकत घेत असतात. शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर बेल्हे येथील बाजारात खिलार जातीच्या बैलांच्या किंमतीमध्ये १५ ते २० टक्क्यांनी वाढ झालेला पहायला मिळाली. बेल्हा येथे भरणारा बैलबाजार हा पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर भरला जाणारा सर्वात मोठा बाजार म्हणून ओळखला जातो. गावठी, खिलार, भडुशी, जर्सी असे विविध जातीचे बैल या बाजारात विकण्यासाठी येतात.

सर्वसाधारण बैलांना या बाजारात किमान ३० ते ६० हजारापर्यंतचा भाव मिळतो. बैलाचा रंग, शिंगं, वाशिंग, दात आणि उंची यावरुन प्रत्येक बैलाची किंमत ठरते. कोरोनामुळे हा बाजार गेली दोन वर्ष बंद होता. ज्यामुळे मालकांची उलाढालही कमी झाली होती. परंतू सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांना आता जरासा आधार मिळाला आहे.

शेतीकाम व घाटात धावणाऱ्या बैलांच्या किमती –

सर्व साधारणपणे १९५० च्या दशकात चांगल्या जातिवंत बैलांची किंमत ही ४०० ते ५०० रुपयांपर्यंत असायाची. या किमतीचे बैल, बैलगाडा शर्यतीसाठी वापरले जायचे. शेती साठीवापरण्यात येणारा बैल हा त्या काळात १५० ते २५० रुपयांपर्यंत मिळायचा. या बाजाराचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे पूर्वीपासून आजपर्यंत गावठी गायीची खरेदी विक्री इथे होत नाही. १९८४ च्या सुमारास बेल्हे ग्रामपंचायतीकडून बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरकडे हस्तांतरित झाला व बाजारच्या आधुनिकीकरणाचे काम सुरु झाले. भाजीपाला व इतर व्यापा-यांसाठी या भागात ओटे बांधण्यात आले.

तसेच प्रत्येक व्यापाऱ्याला परवाना काढण्याची सक्ती करण्यात आली. जागा भाडे सक्तीचे झाले, जनावरांच्या खरेदी-विक्रीवर कर लावण्यात आले. बाजारासाठी येणाऱ्या वाहनांसाठी प्रवेश कर सुरु करण्यात आला. त्यामुळे बेल्हे गावातील लहान-मोठे दुकानदार व बेरोजगार ह्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला. तसेच दिवसेंदिवस महागाई वाढल्यामुळे गाडा शर्यतीसाठीचा चारशे ते पाचशे रुपयांचा बैल आता दोन लाखांपर्यंत मिळू लागले. मात्र बैलगाडा शर्यती बंद झाल्या नंतर शर्यतीच्या बैलांची किंमत पुन्हा कमी झाली होती. शेती साठीचा बैल आजच्या घडीला या बाजारात चाळीस ते ऐंशी हजाराच्या घरात मिळतोय.

पूर्वीच्या आणि आताच्या बाजारात बराच बदल झाला आहे. आजच्या बाजारात साधा चहा दहा रुपये व भाकरीही दहा रुपये झालीय. पूर्वी बाजारात येणारी लोकर, कडबा, अंबाडी, डोंगरी गवत हे आता सर्व बंद झाले. पूर्वी बाजाराचे बरेचसे व्यवहार विश्वासावर चालायचे ते आता राहिले नाही. आता बाजारसाठी (व्यापारासाठी) आणलेले चलन जपत बाजारचे व्यवहार करावे लागतात. अन्यथा एखादा भुरटा चोर हात साफ करून जाउ शकतो. यांत्रिकीकरणामूळे शेतीसाठी यंत्राचा वापर वाढला आणि आता बैलांची खरेदी विक्री सुद्धा घटली. त्यामुळे पुढे जाऊन बेल्ह्याचा बैलबाजारात ही ओळख पुसली गेली तर आश्चर्य वाटू नये इतकंच !

    follow whatsapp