बिहारमध्ये राज्यसभेच्या पाच जागांसाठी मतदान होणार आहे. लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल हा पक्ष दोन जागांचा दावा सांगणार अशी चर्चा आहे. या दोन नावांमध्ये एक नाव लालूप्रसाद यादव यांची मुलगी मीसा भारती असणार हे निश्चित आहे. तर दुसरं नाव कुणाचं असणार? याचा पेच अद्याप सुटलेला नाही. सूत्रांकडून अशी माहिती मिळते आहे की राजद बाबा सिद्दीकींना ही जागा देऊ शकते. बाबा सिद्दीकी हे काँग्रेसचे बडे नेते आहेत. ते मोठे व्यावसायिकही आहेत तसंच अनेकदा ते वादांमध्येही सापडले आहेत.
ADVERTISEMENT
बिहारमध्ये राज्यसभेच्या पाच जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामध्ये दोन भाजप, दोन जयदू आणि एक राजदसाठी आहे. मात्र विधानसभेची सध्याची स्थिती पाहता जदयूला एका जागेचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे यावेळी राजदला दोन जागा मिळू शकतात. यातल्या दुसऱ्या जागेसाठी बाबा सिद्दीकींच्या नावाची चर्चा आहे.
राजदला दोन जागा मिळाल्यानंतर त्यातली एक जागा मिसा भारतींना मिळणार हे स्पष्ट आहे. दुसरी जागा ही कदाचित बाबा सिद्दीकी यांना दिली जाण्याची शक्यता आहे. बाबा सिद्दीकी हे बडे व्यावसायिक आहेत. मुंबईतल्या बांद्रा पश्चिम भागातून काँग्रेसच्या तिकीटावरून ते विधानसभेपर्यंत पोहचले आहेत. त्यांना मंत्रीपदही मिळालं होतं. बाबा सिद्दीकींचे सलमान खान आणि शाहरूख खान यांच्यासह अनेक तारे-तारकांशी चांगले संबंध आहेत.
दुसरीकडे आणखी एक चर्चा अशीही सुरू आहे की राजदची ही जागा कपिल सिब्बल यांना मिळू शकते. कपिल सिब्बल यांना यासाठी राज्यसभेवर धाडण्यात येऊ शकतं कारण त्यांनी लालूप्रसाद यादव यांच्या अनेक केसेस लढल्या आहेत. कपिल सिब्बल सध्या काँग्रेस नेतृत्त्वावर टीका करत आहेत. तसंच जास्त वेळ राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यासाठी देत आहेत.
ADVERTISEMENT