आजकाल तरुणाईमध्ये वाढदिवसाचं सेलिब्रेशन विविध पद्धतीने करण्याचा एक ट्रेंड आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात विचित्र पद्धतीने बर्थ-डे सेलिब्रेशन करणं बर्थ-डे बॉयला चांगलंच महागात पडलं आहे. बर्थ-डे साजरा करत असताना हातात शोभेचा पाऊस घेऊन उभा राहिलेल्या या मुलाच्या डोक्यात मित्रांनी अंडी मारली आणि नंतर पीठ टाकलं. हे पीठ टाकताच मोठा आगीचा भडका उडाला. यामुळे या मुलाच्या चेहऱ्याला दुखापत झाल्याचं कळतंय. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ADVERTISEMENT
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ अंबरनाथ शहरातील बुवापाडा भागातला असल्याचं बोललं जातंय. राहुल नावाच्या एका मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याचे मित्रमंडळी एकत्र जमले होते. सुरुवातीला मित्रांनी केक आणून राहुलच्या हातात केकवर लावण्यात येणारा शोभेचा पाऊल दिला. प्रत्यक्षात सेलिब्रेशनला सुरुवात झाल्यानंतर राहुलच्या मित्रांनी त्याच्या डोक्यात अंडी मारायला सुरुवात केली.
यानंतर एका मित्राने त्याच्या डोक्यावर पीठ टाकलं आणि आगीचा एकच मोठा भडका उडाला. या आगीत बर्थ-डे बॉय राहुलच्या चेहऱ्याला दुखापत झाली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राहुलला गंभीर दुखापत झाल्याच्या काही बातम्या प्रसारमाध्यमांसमोर आल्या होत्या. परंतू अंबरनाथ पोलिसांनी या वृत्ताचा इन्कार केला आहे. बर्थ-डे बॉय राहुलला किरकोळ दुखापत झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. परंतू असं असलं तरीही वाढदिवस साजरा करण्याच्या या अघोरी प्रकारापासून सर्वांनी दूर रहावं असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
ADVERTISEMENT