पश्चिम बंगालमधील राजकीय घटनेनं बंगाल भाजपला मोठा झटका बसला आहे. अवघ्या महिनाभरापूर्वी आपण राजकीय संन्यास घेत असल्याचं सांगत भाजपतून बाहेर पडलेल्या बाबूल सुप्रियो यांनी महिनाभरातच पुन्हा राजकारणात घरवापसी केली. सुप्रियो यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सुप्रियोंच्या गुगलीने भाजपला मात्र अवाक् झाली आहे.
ADVERTISEMENT
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील माजी केंद्रीय मंत्री आणि माजी खासदार बाबूल सुप्रियोंच्या राजकीय खेळीने बंगाल भाजपला चांगलाच धक्का बसला. राजकारणातून संन्यास घेत समाजसेवेचा वसा घेत असल्याची घोषणा करणाऱ्या बाबूल सुप्रिओंनी अवघ्या महिनाभरातच पुन्हा राजकारणात पाऊल ठेवलं.
सुप्रियोंनी भाजपऐवजी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करत राजकारणात पुन्हा पाऊल ठेवल्यानं सगळ्यानाच धक्का बसला आहे. ममता बॅनर्जी यांचा भाचा खासदार अभिषेक बॅनर्जी व खासदार डेरेक ओब्रायन यांच्या उपस्थितीत सुप्रियो यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला.
बाबूल सुप्रियो यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाच्या वतीने निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं. ‘माजी केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांनी तृणमूलचे महासचिव अभिषेक बॅनर्जी व राज्यसभेचे खासदार डेरेक ओब्रायन यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. त्यांचं पक्षामध्ये स्वागत आहे’, असं निवेदनात म्हटलेलं आहे.
सुप्रियो जुलैमध्ये काय म्हणाले होते?
माजी केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांनी जुलै महिन्यात अचानक राजकारणात संन्यास घेत असल्याची घोषणा केली होती. सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून त्यांनी राजकारणापासून दूर जाण्यामागची भूमिका स्पष्ट केली होती. राजकारणात आपण फक्त समाजसेवेसाठी आलो होतो. आता समाजसेवेचा मार्ग बदलत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात राहणं गरजेचं नाही. राजकारणापासून दूर राहूनही उद्देश साध्य करता येऊ शकतो, असं सांगतानाच आपण नेहमी भाजपचा भाग असू, असंही म्हटलं होतं. राजकारणातून संन्यास घेताना आपण आता तृणमूल काँग्रेस वा इतर पक्षात सहभागी होणार नसल्याचंही ते म्हणाले होते. मात्र, नंतर त्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश न करण्याच्या ओळी काढून टाकल्या होत्या.
प्रवेशानंतर सुप्रियो म्हणतात…
तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सुप्रियो म्हणाले, ‘राजकारण सोडणार असं मी मनापासून म्हणालो होतो. पण माझ्यावर मोठी जबाबदार आहे, असं मला वाटलं. राजकारण सोडण्याचा निर्णय चुकीचा व भावनिक असल्याचं माझ्या सर्व मित्रांनी मला सांगितलं. पण माझा हा निर्णय बदलत असल्याचा मला अभिमान आहे. बंगालची सेवा करण्यासाठी या संधीतून मी पुन्हा राजकारणात ये आहेत. मी सोमवारी दीदींची (ममता बॅनर्जी) भेट घेणार आहे. या स्वागताने मी भारावून गेलो आहे’, असं सुप्रियो म्हणाले.
ADVERTISEMENT