बारामती : राज्याच्या राजकारणात एकमेकांच्या विरोधात काम करणाऱ्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बारामतीच्या राजकारणात मात्र मनोमिलन झालं आहे. विषेश म्हणजे मनसेनेही इथे राष्ट्रवादी आणि भाजपसोबत जुळवून घेतलं आहे. त्यामुळे त्यांनाही सत्तेत वाटा मिळाला आहे. राष्ट्रवादी-भाजप-मनसे या युतीची बारामतीमध्ये मोठी चर्चा सुरु आहे.
ADVERTISEMENT
बारामती तालुका सहकारी खादी ग्रामोद्योग संस्थेची निवडणूक अनेक वर्षांपासून बिनविरोध होत आहे. तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांप्रमाणेच या संस्थेवरही राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. यंदा प्रथमच भाजपनेही खादी ग्रामोद्योग संस्थेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. सर्व जागांवर उमेदवार उभे केले. निवडणूक होणार या तयारीने तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे आणि भाजप कार्यकर्ते कामाला लागले.
दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीने देखील सर्व जागांवर आपले उमेदवार निश्चित केले. तिसऱ्या बाजूला मनसेनेही निवडणुकीची तयारी सुरु केली. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मात्र एक अनोख चित्र पाहायला मिळालं. राष्ट्रवादी-भाजप-मनसे या तिन्ही पक्षांमध्ये दिलजमाई झाली.
यातून राष्ट्रवादी काँग्रेसला ६ भाजपला ४ आणि मनसेला एक जागा असं सुत्र निश्चित झालं आणि ही निवडणूक बिनविरोध पार पडली. राज्यात मागील काही दिवसांपासून भाजप-राष्ट्रवादीमध्ये जोरदार संघर्ष सुरु आहे. त्याचवेळी बारामतीमध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेत एक प्रकारे भाजपला मदत केल्याची चर्चा आहे.
याशिवाय या निवडणुकीच्या निमित्ताने बारामतीच्या सहकारी संस्थांमध्ये भाजपचा झालेला चंचुप्रवेश यापुढेही तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, दूध संघ आणि इतर सहकारी संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये पाहायाला मिळणार का असा सवाल आता विचारला जात आहे.
ADVERTISEMENT