भाजप हा हिंदू धर्माचा वापर आणि दलाली करणारा पक्ष आहे अशी टीका करणाऱ्या राहुल गांधींना भाजप नेत्याने प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपचे भोपाळचे आमदार रामेश्वर शर्मा यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करत, तुम्ही आणि तुमचे पूर्वज हिंदू नव्हते. देवाचे आभार माना RSS चा जन्म झाला अशा शब्दांत सुनावलं आहे.
ADVERTISEMENT
काँग्रेसची विचारसरणी भाजप- संघाच्या अगदी विरुद्ध असून, यापैकी एकच विचारसरणी देशावर सत्ता गाजवू शकते, असे अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्लीमध्ये भाषण करताना राहुल म्हणाले होते. ज्यावरुन आता देशात नवीन राजकारण रंगताना दिसत आहे.
“राहुलजी तुम्ही स्वतः हिंदू नसून तुमचे पूर्वजही हिंदू नव्हते. आम्हाला हिंदू असण्याची लाज वाटत नाही. नेहरु असतानाच देशाचं विभाजन झालं. हजारो हिंदू मारले गेले. देवाचे आभार माना की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म झाला”, असं म्हणत रामेश्वर शर्मा यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
ANI वृत्तसंस्थेशी बोलत असताना रामेश्वर शर्मा यांनी आपण राहुल गांधींविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिली. “मी राहुल गांधींविरोधात एफआयआर दाखल करणार आहे. त्यांनी हिंदू देवी, देवतांचा अपमान केल्याप्रकरणी माफी मागायला हवी. तुमची आई आणि बहिणीचा नवरा हे ख्रिश्चन आहेत. त्यामुळे तुमच्यात हिंदूंचं रक्त आहे असं दिसत नाही. हिंदू देवतांचा अपमान थांबवा,” असा इशारा शर्मा यांनी राहुल गांधींना दिला आहे.
भाजप स्वतःला हिंदूंचा पक्ष म्हणवतो आणि देशभरातील लक्ष्मी आणि दुर्गांवर हल्ला करतात. कुठे लक्ष्मीला मारलं जातं आहे तर कुठे दुर्गेला मारलं जातं. भाजपचे लोक फक्त हिंदू धर्माचा वापर आणि दलाली करतात. असे दलाली करणारे लोक हिंदू नाहीत अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती.
आणखी काय म्हणाले राहुल गांधी?
‘महात्मा गांधी यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य हिंदू धर्म समजून घेण्यासाठी दिले तर मग नथुराम गोडसेने त्यांची हत्या का केली? असा सवालही राहुल गांधी यांनी केला. तसेच हा एक विरोधाभास आहे आणि तुम्हाला याचा विचार करावा लागेल, असंही राहुल गांधी म्हणाले. काँग्रेसची विचारसरणी भाजप आणि आरएसएसपेक्षा वेगळी आहे. काँग्रेस कार्यकर्ता म्हणून मी इतर विचारसरणींशी तडजोड करू शकतो पण भाजप आणि आरएसएसच्या विचारसरणीशी कधीही नाही. गांधी-काँग्रेस, आणि गोडसे-सावरकरांच्या विचारधारेमध्ये काय फरक आहे, हा आपल्यासमोरचा एक मोठा प्रश्न आहे, असंही ते म्हणाले.
संघाबाबत काय म्हणाले राहुल गांधी?
जेव्हा तुम्ही महात्मा गांधींचे फोटो पहाल, तेव्हा तुम्हाला त्यांच्या आजूबाजूला 2-3 स्त्रिया दिसतील. तुम्ही आतापर्यंत मोहन भागवत यांचा कोणत्याही महिलेसोबतचा फोटो पाहिला आहे का? असा सवाल करत त्यांची त्यांची संघटना महिलांचं अस्तित्व हिरावून घेते आणि आमची संघटना त्यांना व्यासपीठ देते, असंही राहुल गांधी म्हणाले. आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसने देशाच्या कोणत्याही महिलेला पंतप्रधान केले नाही, हे धाडसही फक्त काँग्रेसनेच केलं असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT