अजिंक्यतारा साखर कारखाना आणि सूतगिरणीने सहकारामध्ये एक अढळ स्थान निर्माण केलेले आहे. कै. भाऊसाहेब महाराजांच्या पावलावर पाऊल ठेऊन या दोन्ही संस्थांचे काम प्रगतिपथावर नेले आहे. त्याच पद्धतीने सातारा जिल्हा बँकेतही सर्वांच्या साथीने प्रामाणिकपणे काम करून बँक प्रगतिपथावर नेण्यासाठी प्रयत्न केले. बँकेच्या प्रगतीचा आलेख चढता ठेवण्यासाठी सहकार पॅनेल हाच एकमेव पर्याय असून, सातारा तालुक्यातील सर्व मते सहकार पॅनेललाच मिळतील, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
भाजप आमदार शिवेंद्र राजेंनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित सहकार पॅनलला मत देण्याचं आवाहन केल्यामुळे सध्या जिल्ह्यात याची चर्चा सुरु आहे.
सातारा जिल्हा बँक निवडणूक : चार राजे बिनविरोध, पण माजी पालकमंत्र्यांसमोर विजयाचं मोठं आव्हान
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी सहकार पॅनेलच्या प्रचारार्थ शेंद्रे येथील अजिंक्यतारा कारखाना कार्यस्थळावरील कै. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन येथे सातारा तालुक्यातील मतदारांचा मेळावा झाला. या वेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, शशिकांत शिंदे, बिनविरोध निवडून आलेले अनिल देसाई, राजेंद्र राजपुरे, सुरेश सावंत, लहुराज जाधव यांच्यासह प्रदीप विधाते, कांचन साळुंखे, ऋतुजा पाटील, रामराव लेंभे आदी उमेदवार आणि पदाधिकारी उपस्थित होते.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘गेल्या ५- ६ वर्षांत बँकेचा अध्यक्ष म्हणून उल्लेखनीय कामकाज केले. सर्व सहकारी संचालकांच्या सहकार्याने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच हे शक्य झाले आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. बँकेचा इतिहास पाहता राजकारण विरहित कामकाज झाले आहे. राज्य आणि देशात आपल्या बँकेचे नाव अग्रेसर आहे. बँकेची घोडदौड कायम ठेवण्यासाठी सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांना निवडून आणणे आवश्यक आहे. सातारा तालुक्यातील मतदार विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता सहकार पॅनेलच्या पाठीशी १०० टक्के खंबीरपणे उभे राहतील.’’
त्यामुळे आगामी दिवसांमध्ये सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पहायला मिळणार आहे.
ADVERTISEMENT