सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून होत असलेली कारवाई हा सध्या राज्याच्या राजकारणातला चर्चेचा विषय ठरला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊ इब्राहीमच्या हस्तकांसोबत मालमत्तेचा व्यवहार केल्याप्रकरणात मंत्री नवाब मलिक हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. या मुद्द्यावरुन प्रत्येक दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीका होते आहे. अशातच भाजप आमदार श्वेता महाले यांनी शिवसेनेला टीकेचं लक्ष्य केलं आहे.
ADVERTISEMENT
शिवसेनेचं हिंदुत्व हे आता फक्त दाखवण्यापूरतं राहिलेलं आहे. ज्या शिवसेना भवनात नवाब मलिकांनी बॉम्बस्फोट केले त्यांनाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वाचवत असल्याचा गंभीर आरोप श्वेता महाले यांनी केला.
काय म्हणाल्या श्वेता महाले?
शिवसेनेचं हिंदुत्व हे आता फक्त दाखवण्यापूरतं राहिलेलं आहे. ज्या दिवशी ते काँग्रेससोबत सत्तेत बसले त्यादिवशीच त्यांनी हिंदुत्वाला लाथ मारली आहे. दोन वर्षांमध्ये आपण पाहत आहोत की सतत एका विशिष्ठ विचारधारेच्या लोकांना संरक्षण दिलं जातं, त्यांनाच योजना दिल्या जातात. ज्या हिंदुत्वाचा विचार घेऊन बाळासाहेब लढले, मोठे झाले तो विचार आताचे पक्षप्रमुख विसरलेले आहेत.
नवाब मलिक कोण आहे, त्यांना दाऊदच्या हस्तकांसोबत केलेल्या व्यवहारांबद्दल सध्या अटक झाली आहे. नवाब मलिकांनी शिवसेना भवनामध्ये बॉम्ब स्फोट घडवून आणले, त्यालाच उद्धव ठाकरे वाचवत आहेत. त्यामुळे उद्या MIM जरी यांच्यासोबत आली तरी आश्चर्य वाटणार नाही. शिवसेनेचं हिंदुत्व हे ढोंग आहे, आता ते फक्त बोलण्यात दिसतं. कृतीची वेळ जेव्हा येते ते कुठेच दिसत नाही. ते हिंदुत्व बाळासाहेबांसोबत निघून गेलं आहे.
नवाब मलिकांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने सभागृहात चांगलाच गोंधळ घातला होता. यानंतर राज्य सरकारने नवाब मलिक यांच्याकडील खात्यांचा पदभार काढून घेत त्यांचं मंत्रीपद कायम ठेवलं आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला नवाब मलिक हे बिनखात्याचे मंत्री आहेत. मलिकांची खाती काढून घेण्यात आली असली तरीही त्यांचा राजीनामा सरकार घेणार नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केलंय. त्यामुळे आगामी काळात हा संघर्ष आता कुठपर्यंत चालतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT