मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर म्हणजेच शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी बॉम्बे हायकोर्टाने उद्धव ठाकरेंना संमती दिली आहे. यानंतर आता याबाबत प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी याबाबत ट्विट करत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे केशव उपाध्ये यांनी?
बीकेसीवर दसरा मेळावा आणि शिवाजी पार्कवर हसरा मेळावा असं एका ओळीचं ट्विट केशव उपाध्ये यांनी केलं आहे. एवढंच नाही तर उद्या पितृपक्ष संपणार असाही टोमणा त्यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणात म्हणतात की माझा पक्ष हा पितृ पक्ष आहे कारण तो माझ्या वडिलांन स्थापन केला आहे. अशात उद्या (रविवार) सर्वपित्री अमावस्या आहे. यादिवशी सुरू असलेल्या पितृ पक्षाचा शेवटचा दिवस आहे हाच धागा धरत केशव उपाध्येंनी उद्या पितृ पक्ष संपणार असंही ट्विट केलं आहे.
मुंबईतल्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं मुंबई महापालिकेकडे परवानगी मागितली होती. शिवसेनेनं परवानगी मागितल्यानंतर शिंदे गटाचे सदा सरवणकर यांनीही महापालिकेकडे अर्ज केला होता. त्यानंतर महापालिकेनं दोन्ही अर्ज फेटाळून लावले होते.
मुंबई महापालिकेनं शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्यास परवानगी नाकारल्यानंतर शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. शिवसेनेनं महापालिकेच्या निर्णयाला आव्हान दिल्यानंतर शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांनी शिवसेनेच्या याचिकेला विरोध करणारी हस्तक्षेप याचिका दाखल केली होती.
मुंबई उच्च न्यायालयाने आज शिवसेना, शिंदे गट आणि मुबई महापालिका अशा तिन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. तिन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निकाल दिला.
शिवसेना दसरा मेळावा २०२२ : मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल काय?
मुंबई उच्च न्यायालयाने निकाल देताना सदा सरवणकर यांची विरोध करणारी याचिका फेटाळून लावली. सदा सरवणकर यांना शिवसेनेकडून याचिका करण्याचा अधिकार नसल्याच्या युक्तिवाद मान्य करत मुंबई उच्च न्यायालयाने सदा सरवणकर यांची याचिका फेटाळली.
मुंबई महापालिकेनं शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासंदर्भात करण्यात आलेल्या दोन्ही अर्जांना परवानगी नाकारली. महापालिकेचा निर्णय बरोबर आहे. पोलिसांनी केलेल्या सूचनेनंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा लक्षात घेऊन बीएमसीने दोन्ही अर्जांना परवानगी नाकारली, असं न्यायालयाने निकाल देताना म्हटलं.
या सगळ्यानंतर आता केशव उपाध्ये यांनी बीकेसीवर दसरा मेळावा आणि शिवाजी पार्कवर हसरा मेळावा असं म्हणत उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे हे आपल्या भाषणांमध्ये टोमणे मारत असतात आणि शाब्दिक कोट्या करत असतात त्या अनुषंगाने हा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.
ADVERTISEMENT