गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये महिलांवर होणाऱ्या शाररिक अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. विरोधी पक्षातील भाजपने या मुद्द्यावरुन सरकारला घेरलेलं असतानाच औरंगाबादमध्ये दरोडेखोरांनी गावातील दोन महिलांवर सामुहीक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली.
ADVERTISEMENT
औरंगाबादच्या घटनेवरुन भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सरकारवर टीका करताना शिवसेना खासदार संजय राऊतांवरही टीकेचे आसडू ओढले आहेत.
संजय राऊतांची लेखणी महिला संरक्षणाऐवजी भ्रष्टाचाऱ्यांच्या रक्षणासाठी परजतेय. कदाचीत उच्च प्रतीच्या गांजाची नशा उतरली नसल्यामुळे संजय राऊतांपर्यंत औरंगाबाद महिला अत्याचाराची घटना पोहचली नसेल असा हल्लाबोल चित्रा वाघ यांनी केला आहे.
याचसोबत औरंगाबादच्या घटनेवरुन आपण निजामाच्या राजवटीत राहतोय की काय असा प्रश्न पडल्याचं म्हणत चित्रा वाघ यांनी राज्य सरकार आणि गृह मंत्रालयाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील तोंडोळी गावात रात्री 11 वाजण्याच्या सुमारास 7-8 दरोडेखोरांनी शेत वस्तीवर हल्ला चढवला. सुरवातीला वस्तीवर असलेल्या पुरुषांना चाकू आणि कुऱ्हाडीचा धाक दाखवण्यात आला. त्यांनतर त्यांना बांधून ठेवले. त्यानंतर घरातील एका 23 वर्षीय आणि दुसऱ्या 30 वर्षीय महिलेवर चार दरोडाखोरांनी सामूहिक बलात्कार केला. यावेळी घरातील वस्तू आणि पैसेही या दरोडेखोरांनी चोरले आहेत.
यावेळी दरोडेखोरांनी घरातील पुरुषांना उलट्या कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून आधी त्यांना घराबाहेर काढले. त्यातील एकाला दोरीने बांधून ठेवले. त्यानंतर घरातील महिलांवर चौघांनी अत्याचार केले. ज्या दोन महिलांवर सामूहिक बलात्कार झाला त्यातल्या एका महिलेला आठ महिन्यांचं बाळ आहे. ही बाब लक्षात आली असूनही दरोडेखोरांनी हे अमानुष कृत्य केलं.
ADVERTISEMENT