रशिद किडवई
ADVERTISEMENT
चिराग पासवान घराणेशाहीतून मिळालेली गादी सांभाळू शकले नाहीत. चिराग पासवान यांना त्यांच्याच पक्षाने बेदखल केलं आहे. LJP अर्थात लोक जनशक्ती पार्टीच्या अध्यक्षपदावरून त्यांना हटवण्यात आलं आहे. कदाचित चिराग पासवान या सगळ्यातून सावरण्यासाठी हातपाय मारतील. मात्र भारतीय राजकारणाचा आणि लोकशाहीचा इतिहास लक्षात घेतला तर वारसा किंवा घराण्यातून मिळालेली गादी ही अनेकांना मिळाली आहे. एक काळ असा होता की फक्त राजे-राण्या यांचेच वारस असत. देशात लोकशाही आली, रूजली पण घराणेशाही ही अलिखित स्वरूपात कायम राहिली. नेत्याचा मुलगा नेता होणार हे जणू काही समीकरणच झालं. गवयाचं पोर सुरात रडतं असं म्हणतात.. तसं राजकारण्याचं पोर राजकारणातच येणार हे भारतीय लोकशाहीत अनेकदा पाहण्यास मिळालं आहे.
BLOG : शशी थरूर काँग्रेस पक्ष सोडणाऱ्यांना शरद पवारांचं उदाहरण देऊ पाहात आहे का?
संपूर्ण भारतातली राजकारणी घराणी लक्षात घेतली तर ठाकरे, अब्दुल्ला, यादव, बादल अशी किती तरी नावं घेता येतील. या घराण्यांनी घराणेशाही जपली, पुढे नेली. आंध्रप्रदेशातले नंदामुरी तारका रामाराव म्हणजेच NTR आणि तामिळनाडूमधल्या मुर्थुर गोपालन रामचंद्र यांच्या पत्नी जानकी यांना मात्र आपल्याला वारसा हक्काने मिळालेली गादी सांभाळता आली नाही. मात्र निर्माण झालेल्या खडतर परिस्थितीतून त्यांनी वाट काढली.
रामविलास पासवान यांचा मुलगा असलेला चिराग याने अभियांत्रिकी शिक्षण घेतलं आहे. सुरूवातीला चिरागला अभिनयात करिअर करावं असं वाटत होतं म्हणूनच चिरागने 2011 मध्ये कंगना रणौतसोबत मिले ना मिले या चित्रपटात भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न केला. काही चाहत्यांना चिरागचं हे रूप आवडलंही. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला.
चित्रपटसृष्टीत आपलं काही खरं नाही हे एका फ्लॉपनेच चिरागला शिकवलं आणि तो आपल्या वडिलांच्या क्षेत्रात अर्थात राजकारणात उतरला. आपल्याला राजकारणात काहीही धोका नाही. आपल्या वडिलांनी आपल्यासाठी जमीन तयार करून ठेवली आहे तिथे हिट, फ्लॉप ठरण्याचा प्रश्न येणार नाही असं चिरागला वाटलं होतं. एक सिनेमा फ्लॉप ठरलेल्या चिरागला 2012 मध्ये स्टारडस्टने ‘उद्याचा सुपरस्टार’ हा पुरस्कार देऊन गौरवलं. मात्र चिराग तोपर्यंत राजकारणात आला होता. आपला मुलगा चांगली कामगिरी करेल असं रामविलास पासवान यांनाही वाटू लागलं होतं. या सगळ्या कालावधीत 2014 जी लोकसभेची निवडणूक झाली त्यामध्ये चिराग पासवान खासदार म्हणून निवडून आला. त्यानंतर रामविलास पासवान यांचा आत्मविश्वास आणखी दुणावला. त्यामुळेच तर पासवान यांनी आपल्या मृत्यूच्या साधारण वर्षभर आधीच चिरागकडे लोकजनशक्ती पार्टीचं अध्यक्षपद सोपवलं.
14 जून 2021 चा सोमवार हा चिराग पासवानसाठी काळा सोमवार ठरला. एकदा चिरागने स्वतःचं वर्णन मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हनुमान आहे असं केलं होतं. एवढंच नाही तर त्याने प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येतल्या मंदिरासाठी 1.11 लाख रूपये दानही दिलं. मात्र जेव्हा लोकजनशक्ती पार्टीच्या सहा पैकी पाच खासदारांनी बंडखोरी केली तेव्हा चिरागने केलेल्या वल्गना पोकळ ठरल्याचंच दिसून आलं.
आता थोडंसं इतिहासाकडे वळुयात जसं चिराग पासवान वन फिल्म वंडर ठरला तसं एक सुपरस्टार होऊन गेला. NTR.. 1949 ते 1982 या कालावधीत NTR ने त्यांची सिनेसृष्टीतली कारकीर्द गाजवली. नायक असो की खलनायक सगळ्याच भूमिका लीलया पेलल्या, निभावल्या. 292 सिनेमांमधून त्यांनी अभिनय केला.
BLOG : जिल्हा परिषद सदस्य असलेले राजीव सातव हे राहुल गांधींजवळ कसं गेले?
‘The Lion of Bobbili’ हा 1982 मध्ये आलेला NTR यांचा शेवटचा सिनेमा होता. या सिनेमानंतर NTR यांनी सिनेसृष्टी सोडली आणि ते राजकारणात आले. एका सिनेमात त्यांनी एका लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. एक लष्करी अधिकारी भ्रष्ट सरकारविरोधात कसा लढा देतो आणि सरकारला कसं जेरीस आणतो अशी ती कथा होती. NTR यांचा हा सिनेमा आजही सिनेमागृहांमध्ये लागला तर गर्दी खेचतो इतका प्रसिद्ध झाला होता. दरम्यान NTR यांनी राजकारणात प्रवेश करत तेलगू देसम पार्टी हा पक्ष स्थापन केला. त्यानंतर NTR यांचे जावई चंद्राबाबू नायडू यांनी हा पक्ष वाढवला, मोठा केला.
NTR यांचं चरित्र लिहिणारे आणि ज्येष्ठ पत्रकार एस. वेंकट नारायण सांगतात, ‘NTR यांना एवढी प्रसिद्धी मिळाली होती की त्यांना जवळपास तीन कोटी लोक पाठिंबा देणारे होते. त्यांच्यासारखा नेता झाला नाही. त्यांची भाषण करण्याची लकब, लोकांना आपलंसं करून घेण्याची कला ही मी नंतर कोणत्याही नेत्यामध्ये पाहिली नाही. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा लोकांवर प्रभाव पडत असे. लोकांचं एवढं प्रेम, माया, आपुलकी आणि पाठिंबा क्वचितच एखाद्या नेत्याला मिळतो. NTR हे त्यापैकीच एक होते. स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधींना जसा पाठिंबा मिळाला आणि अनुयायी लाभले अगदी तसेच नंतर NTR यांना लाभले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ‘
TDP ने 202 जागा जिंकून त्या काळी सत्ता काबीज केली. 294 पैकी 202 जागा या तेलगू देसम पार्टीला मिळाल्या तर काँग्रेसला अवघ्या 60 जागांवर समाधान मानावं लागलं. NTR यांची सत्ता आली. 26 ऑगस्ट 1995 पर्यंत म्हणजेच NTR तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याला नऊ महिने पूर्ण होईपर्यंत सगळं आलबेल होतं. मात्र त्यानंतर चंद्रबाबू नायडू म्हणजेच NTR यांचे जावई चंद्राबाबू नायडू यांनी बंड पुकारलं
एन. टी. रामाराव यांच्या दुसऱ्या पत्नी लक्ष्मी पार्वती यांचा पक्षावरचा प्रभाव वाढत होता. हेच कारण पुढे करत चंद्राबाबू नायडू यांनी आपले सासऱ्यांच्या विरोधातच दंड थोपटले. लक्ष्मी पार्वती या एन. टी. रामाराव यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. 1993 मध्ये त्यांनी रामाराव यांच्यासोबत आपल्या कुटुंबीयांच्या मर्जीविरोधात जाऊन लग्न केलं होतं. दरम्यान इकडे चंद्राबाबू नायडू यांना लक्ष्मी पार्वती यांचा पक्षात वाढत असलेला प्रभाव पटला नाही म्हणून त्यांनी बंडाचं निशाण फडकवलं. त्यानंतर एका रात्रीत 200 आमदारांनी NTR ना दिलेला पाठिंबा काढला
एन. टी. रामाराव कायम एक वाक्य म्हणत असत आपल्या आयुष्यात काय घडणार आहे ते घडणार आहेच. विजय आणि पराभव हे प्रकाश आणि अंधाराप्रमाणे असतात. त्यांच्या बाबतीत ते म्हणत होते तेच वाक्य खरं ठरलं. 2009 मध्ये The Other Side of Truth नावाचं एक पुस्तक प्रकाशित झालं होतं. या पुस्तकात एन.टी. रामाराव यांचे दुसरे जावई व्यंकटेश्वर राव म्हणाले होती की, नायडू यांनी केलेल्या बंडामुळे NTR संतापले होते. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाला म्हणजेच अभिनेता नंदमुरी बालकृष्णाला चंद्राबाबू नायडूंच्या रक्ताने माखलेली तलवार मला दाखव असं सांगितलं होतं.
एवढंच नाही तर व्यंकटेश्वर राव म्हणतात की चंद्रबाबू नायडू यांना पहिल्यापासूनच NTR ना हटवायचं होतं आणि पक्षाचा अध्यक्ष व्हायचं होतं. एवढंच नाही तर मुख्यमंत्री होण्याचीही त्यांची महत्वाकांक्षा होतीच. जेव्हा NTR यांनी 1982 मध्ये तेलगू देसम हा पक्ष स्थापन केला तेव्हाही चंद्राबाबू नायडूंनी आपल्या सासऱ्यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली होती. हे स्पष्ट करण्यासाठी व्यंकटेश्वर राव यांनी काँग्रेस नेते के रोझय्या यांच्या वक्तव्याचाही संदर्भ दिला आहे.
काय म्हणाले होते के रोझय्या?
चंद्राबाबू नायडू यांनी 1982 मध्ये त्यावेळी पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधींशी चर्चा केली होती आणि आपल्याला एन. टी. रामाराव यांच्याविरोधात निवडणूक लढवायची असल्याचंही सांगितलं होतं. मात्र इंदिरा गांधी यांनी असं करण्यास नकार दिला. आमच्या पक्षाला तुमचं हे धोरण मान्य होणार नाही असं सांगत इंदिरा गांधी यांनी चंद्राबाबू नायडूंना असं करण्यास स्पष्ट शब्दांमध्ये नकार दिला होता. असंही रोझय्या यांनी म्हटल्याचं व्यंकटेश्वर राव यांनी नमूद केलं आहे.
जानेवारी 1996 मध्ये NTR यांचं निधन झालं. 1995 मध्ये जे बंड नायडू यांनी केलं होतं त्याबद्दल नायडू यांचं म्हणणं काय हे 2011 मध्ये समोर आलं. NTR यांच्याविरोधात मी बंड पुकारलं नसतं तर पक्ष दुष्ट शक्तींच्या हातात गेला असता, राज्य वाचवण्यासाठी मी बंड केल्याचं चंद्रबाबू नायडू यांनी सांगितलं. लक्ष्मी पार्वती म्हणजेच NTR यांच्या दुसऱ्या पत्नी यांनी जर पक्षावर कब्जा केला असता तर परिस्थिती कठीण झाली असती असंही त्यावेळी नायडू यांनी सांगितलं.
मला माझ्या स्वप्नातही असं कधी वाटलं नव्हतं की मी माझे सासरे NTR यांच्या विरोधात बंड पुकारेन. एन. टी. रामाराव हे माझे फक्त सासरे नव्हते तर मी त्यांना माझं दैवत मानलं होतं. मात्र लक्ष्मी पार्वती या त्यांच्या आयुष्यात आल्या आणि त्यांच्यावर वेगळ्याच गोष्टींचा प्रभाव पडू लागला. त्यामुळे TDP ला वाचवण्यासाठी आमच्यासमोर काही पर्यायच उरला नाही. असं स्पष्टीकरण चंद्राबाबू नायडू यांनी दिलं आहे.
तिकडे तामिळनाडूमध्ये MG रामचंद्रन यांचा मृत्यू 1987 मध्ये झाला. तेव्हा त्यांच्या विधवा पत्नी जानकी रामचंद्रन यांना वाटलं होतं की आता आपण पक्ष आणि सरकार चालवू. मात्र त्यांच्या नेतृत्वात पक्ष आणि सरकार अवघे 24 दिवस चाललं. विश्वासमत ठरावाच्या दिवशी तामिळनाडू सरकार तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी बरखास्त केलं आणि तिथे राष्ट्रपती राजवट लागू केली.
राष्ट्रपती राजवट उठवण्यात आल्यानंतर DMK आणि AIDMK यांनी मतदान घेतलं. AIDMK च्या उत्तराधिकारी या जयललिता झाल्या होत्या. त्यावेळी त्या पक्षाच्या सरचिटणीस होत्या. पक्षाच्या नेत्या म्हणून त्यांचा उदय झाला. जुने जाणते लोक सांगतात की जानकी रामचंद्रन या आक्रमक होत्या. मात्र जेव्हा MGR यांचं निधन झालं तेव्हा करूणानिधी यांनी ही संधी साधली आणि मुख्यमंत्री झाले. तर जयललिता या विरोधी पक्ष नेत्या झाल्या. जयललिता यांनी 1982 मध्ये AIDMK या पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द प्रचंड प्रमाणत बहरली. अवघ्या पाच वर्षांमध्ये त्या पक्षाच्या सरचिटणीस झाल्या आणि MGR यांच्या उत्तराधिकारी म्हणूनही त्यांनी स्वतःला घोषित केलं होतं. मात्र त्यांना MGR यांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्रीपद मिळालं नाही ते मिळालं करुणानिधी यांना. 1991 मध्ये जयललिता मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या.
दरम्यान जानकी रामचंद्रन यांनी MGR यांच्या मृत्यूनंतर विरोधात असलेल्या एम. करूणानिधी यांच्याकडे पाठिंबा मागितला होता. विश्वासमत ठरावाच्या वेळी आम्हाला मदत करा असं जानकी रामचंद्रन यांनी म्हटलं होतं. त्यामुळे जानकी यांनी पक्षाच्या लोकांचा विश्वास गमावला अशी आठवण ज्येष्ठ पत्रकार आर मणी यांनी सांगितली आहे.
राजकारणात सत्ता हा सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो. राजकीय महत्त्वाकांक्षा हादेखील तेवढाच महत्त्वाचा घटक. त्यासाठी साम-दाम-दंड-भेद अशी कोणतीही निती वापरण्यास नेते तयार असतात. त्यामुळे लोकजनशक्ती पार्टीमध्ये झालेलं बंड ही देखील उद्याच्या सत्तासंघर्षाची नांदी आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. एकंदरीत जो उहापोह आपण केला तो तरी हेच सांगतो.
ADVERTISEMENT