अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यातला संघर्ष इतक्यात संपेल असं काही दिसत नाही. याचं कारण आहे ते म्हणजे नवनीत राणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलेलं आव्हान. मातोश्रीसमोर येऊन हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हणणार असं नवनीत राणा आणि रवी राणा यांनी म्हटलं होतं. त्यानंतर हे दोघे मुंबईत आले तेव्हा राडा झाला. या दोघांनाही अटक करण्यात आली होती. ४ मे रोजी या दोघांना जामीन मिळाला. आता आज मुंबई महापालिकेने नवनीत राणा यांना नोटीस धाडली आहे.
ADVERTISEMENT
खासदार नवनीत राणा यांच्या घराच्या बांधकामाची मुंबई महापालिकेने पाहणी केली त्यानंतर त्यातलं बांधकाम अनधिकृत असल्याचा आणि मिळालेल्या बांधकामात बदल केले असल्याचा ठपका ठेवण्यात आला. हे बांधकाम का पाडण्यात येऊ नये? असा प्रश्नही मुंबई महापालिकेने विचारला आहे तसंच पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे.
Hanuman Chalisa Row : नवनीत राणा, रवी राणांच्या जामीनावरुन न्यायालयात काय घडलं?
काय म्हटलं आहे नोटिशीत?
राणा दाम्पत्याच्या घरात जो लिफ्टचा भाग आहे तिथे टॉयलेट बांधण्यात आलं आहे.
राणा दाम्पत्याच्या घरात स्वयंपाक घर आणि देवघर एकत्र करण्यात आलं आहे आणि ती लिव्हिंग रूम करण्यात आली आहे
लॉबीचा भाग फ्लॅटच्या आतल्या बाजूस घेण्यात आला आहे
छताचा भागही बेडरूमला जोडला गेला आहे
छताच्या पुढे जी जागा होती तिथे बाल्कनी बांधण्यात आली आहे
लिव्हिंग रूमची जागा बेडरूम आणि किचन यांच्यात विभागण्यात आली आहे
बाल्कनी बेडरूम आणि स्वयंपाक घर यांना जोडण्यात आली आहे
टॉयलेट आणि दक्षिण पश्चिम भागात असलेला मोकळा भागही बेडरूमला जोडला गेला आहे
पश्चिम भागात दोन बेडरूम होते ते एकत्र करून मोठं बेडरूम करण्यात आलं आहे
असे सगळे आक्षेप महापालिकेने आज पाठवलेल्या नोटिशीत घेतले आहेत. तसंच हे सगळं बांधकाम सात दिवसात का पाडू नये असाही प्रश्न विचारला आहे. हे सगळे बदल तुमच्या राहत्या घरामध्ये तुम्ही का केलेत? याचं उत्तर द्या त्यासाठी तुम्हाला सात दिवसांची मुदत देण्यात येते आहे.
जर सात दिवसात तुम्ही पुरेसं समाधानकारक कारण दाखवण्यात अपयशी ठरलात तर या आठवड्या भराने तुमच्या या घरावर कारवाई का केली जाऊ नये? असा प्रश्नही महापालिकाने विचारला आहे. एवढंच नाही तर हे सगळे बदल केल्याने तुम्ही दोघंही (राणा दाम्पत्य) दंडास पात्र असाल असंही सांगण्यात आलं आहे. आता सात दिवसात राणा दाम्पत्य याबाबत काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राणा दाम्पत्याला याआधीही नोटीस बजावण्यात आली होती त्यावेळी आमच्यावर ही कारवाई सुडबुद्धीने करण्यात आली आहे असा आरोप राणा दाम्पत्याने केला आहे. उद्या हे आमचं घरही पाडू शकतात असंही नवनीत राणा आणि रवी राणा यांनी म्हटलं आहे. मुंबईत आमचं एकच घर आहे, शिवसेनेच्या नेत्यांसाऱखी दहा घरं नाहीत. आम्हाला बेघर केलंत तरीही लढा देत राहू असंही या दोघांनी म्हटलं आहे. राणा दाम्पत्य मुंबईत उद्धव ठाकरेंच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी आलं होतं तेव्हा खार या ठिकाणी असलेल्या घरीच थांबलं होतं. त्याच घराला मुंबई महापालिकेने नोटीस बजावली आहे.
ADVERTISEMENT