देशभरासह राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटचं संकट घोंगावत असताना मुंबई महापालिकेने आता लहान मुलांना कोरोनाची लस देण्याची तयारी सुरु केली आहे. २ ते १८ वयोगटातील मुलांना कोरोनाची लस देण्यासाठीचा नियोजनबद्ध आराखडा महापालिकेने तयार केला असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे महापौर पेडणेकर यांनी केलेली घोषणा दिलासादायक मानली जात आहे.
ADVERTISEMENT
मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे महापालिका प्रशासन शाळा पुन्हा बंद करण्याचा विचार करत आहे. पुढील आठवड्यापर्यंत लहान मुलांच्या लसीकरणासाठीचा आराखडा बाहेर येईल अशी माहिती पेडणेकर यांनी दिली.
“लहान मुलांच्या लसीकरणासाठीचा आराखडा तयार झाला आहे. आम्ही २ ते १८ वयोगटातील मुलांना लस मिळेल याची सोय केली आहे, ही संपूर्ण ब्ल्यू प्रिंट पुढील आठवड्यात आम्ही जाहीर करु”, असं पेडणेकर म्हणाल्या. याचवेळी महापौरांनी मुंबईकरांना घराबाहेर पडताना मास्क घालण्याची विनंती केली. लोकं घराबाहेर पडताना मास्कचा वापर करत नाहीत म्हणून क्लिनअप मार्शल्सची नेमणूक अजुनही करावी लागते आहे. पुढे जाऊन मास्क न घातलेल्या व्यक्तींकडून दंड स्विकारताना Digital Payment चा पर्याय देण्याचाही महापालिकेचा प्रयत्न असल्याचं पेडणेकर म्हणाल्या.
लस घेतलेल्यांचंही ‘ओमिक्रॉन’ने वाढवलं टेन्शन! केंद्राच्या माहितीनंतर तज्ज्ञांचा इशारा
ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. पाच पेक्षा जास्त लोकांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास या काळात मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने कठोर नियम लागू करु नयेत असं वाटत असेल तर नागरिकांनी नियमांचं पालन करावं असं आवाहन पेडणेकर यांनी केलं आहे. ओमिक्रॉनमध्ये कोणीही घाबरुन जाण्याची गरज नसली तरीही प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज असल्याचंही पेडणेकर म्हणाल्या.
ADVERTISEMENT