– मनिष जोग, जळगाव प्रतिनिधी
ADVERTISEMENT
प्रत्येक मुलीसाठी आपला लग्नसोहळा हा एक खास क्षण असतो. आपल्या आई-वडिलांच्या सोबतीने माहेरचा निरोप घेऊन नवीन आयुष्याची सुरुवात करताना प्रत्येक मुलगी आनंदाचे क्षण या सोहळ्यात अनुभवण्याचा प्रयत्न करत असते. परंतू जळगावमधील प्रियंका पाटील या मुलीचा विवाहसोहळा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. याला कारण ठरलंय, वडिलांचं छत्र गमावलेल्या प्रियंकाने लग्नसोहळ्यात आपल्या बाबांची आठवण ठेवून उचललेलं पाऊल.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील नांद्रा गावात प्रियंका पाटीलचा लग्नसोहळा आज पार पडला. प्रियंकाने आपल्या लग्नात वडीलांची सोबत असावी या भावनेने त्यांचा पुतळा तयार करुन घेतला. आपल्या बाबांच्या पुतळ्याच्या साक्षीने प्रियंका आज विवाहबंधनात अडकली.
प्रियंकाचे वडील भागवत पाटील हे माजी सैनिक होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांचं कोरोनामुळे निधन झालं. भागवत पाटील यांना चार मुली आहेत. प्रियंका ही त्यांची तिसरी मुलगी. पहिल्या दोन मुलीचं लग्न थाटामाटात केल्यानंतर प्रियंकाचं लग्नही अशाच थाटात करायची भागवत यांची इच्छा होती. परंतू कोरोनामुळे भागवत यांचं निधन झालं आणि पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
कालांतराने नातेवाईकांच्या साथीने पाटील कुटुंब यातून सावरलं. काही दिवसांनी प्रियंकाच लग्नही ठरलं. परंतू आपले लाडके बाबा आपल्या लग्नात नसणार ही सल प्रियंकाला सतावत होती. त्यामुळेच तिने आपल्या बाबांचा पुतळा तयार करुन त्यांच्या साक्षीने लग्नात सात फेरे घेण्याचा निर्णय घेतला. आपल्या वडिलांप्रमाणे हुबेहुब दिसणारा सिलीकॉन मटेरिअलचा पुतळा तयार करत, त्याला चांगल्या पद्धतीने सजवत प्रियंकाने लग्नात आपली हौस भागवून घेतली.
या प्रसंगी मुंबई तक ने प्रियंका पाटील हीची प्रतिक्रीया जाणून घेतली. “पप्पांची खूप इच्छा होती की माझ्या चारही मुलींचं लग्न मी थाटामाटात पार पडणार. आपल्याला मुलगा झाला नाही पण पप्पांनी आम्हाला कधीच याची जाणीव होऊ दिली नाही. त्यांनी मुलगा-मुलगी कधीच फरक केला नाही, चांगलं शिक्षण दिलं. पहिल्या दोन बहिणींचं लग्न त्यांनी थाटामाटात केलं. माझं लग्नही त्यांना थाटामाटात करायचं होतं. परंतू कोरोनामुळे त्यांची छत्रछाया आमच्यावरुन गेली.”
बाबांची उणीव मला जाणवत होती. त्यामुळे लग्नात त्यांचा एखादा पुतळा तयार करुन घ्यावा अशी माझी इच्छा होती. यासाठी मी यु-ट्यूबवर बरचं सर्च केलं. कर्नाटकात एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा पुतळा तयार केला होता, परंतू त्याचा खर्च खूप होता आणि त्यासाठी खूप वेळही लागणार होता. त्यामुळे माझ्या बजेटमध्ये बसेल असा पुतळा बनवणाऱ्या व्यक्तींशी संपर्क साधून मी तो तयार करुन घेतला. लग्नाच्या दिवशी पप्पा माझ्यासमोर असावेत ही एकच इच्छा होती. पुतळ्याकडे पाहिल्यानंतर मला लग्नात पप्पा माझ्यासोबत आहेत असंच वाटत होतं, असं प्रियंकाने सांगितलं.
साजनाची स्वारी आली, लाज गाली आली! असा रंगला विकी-कतरिनाचा ‘हळदी सोहळा’
कोरोनामुळे अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं. परंतू आयुष्यभर आपल्या पाठीशी उभं राहणाऱ्या वडिलांची आठवण ठेऊन, त्यांच्या मृत्यूनंतरही लग्नसोहळ्यात प्रियंकाने त्यांना दिलेला मान पाहून उपस्थित मंडळींचेही डोळे भरुन आले होते.
Katrina Kaif : कतरिनाच्या मंगळसूत्राने वेधलं सगळ्यांचं लक्ष, किंमत ऐकून थक्क व्हाल
ADVERTISEMENT