नांदेड : राष्ट्रवादीचे नेते, आमदार एकनाथ खडसे हे सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत असतात. आता एका वादामुळे एकनाथ खडसे पुन्हा चर्चेत आले आहेत. निवडणुकीच्या काळात बंजारा समाजाबद्दल अक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी खडसे यांच्याविरोधात विमानतळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. मोहन चव्हाण यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
निवडणुकीच्या काळात जळगावच्या एका मेळाव्यात बोलताना, बंजारा समाजाला २ किलो मटण, १ किलो बोटी आणि दारू दिलं की दुसरं काही लागत नाही असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांच्या याच वादग्रस्त वक्तव्याविरोधात बंजारा समाज आक्रमक झाला होता. तसंच खडसेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही बंजारा समाजाने केली होती. नांदेडमध्ये देखील राष्ट्रीय बंजारा परिषदेतर्फे खडसे यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन केले होते.
राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. मोहन चव्हाण यांनी खडसेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. नांदेड शहरातील विमानतळ पोलीस ठाण्यात त्यांनी खडसे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती. मोहन चव्हाण यांच्या तक्रारी नंतर एकनाथ खडसे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात ५०५/२ नुसार समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. मोहन चव्हाण म्हणाले, एकनाथ खडसे हे वयोवृद्ध असताना आणि बंजारा समाजाच्या मतांवर आजपर्यंत निवडून आले असताना, ते बंजारा समाजाची लायकी काढतात. एका सार्वजनिक ठिकाणी असं सांगतात, बंजारा समाज हा २ किलो मटण, १ किलो बोटी आणि दारु दिलं की दुसरं काही लागत नाही. याचा मी जाहीर निषेध करतो. तसंच त्यांनी बंजारा समाजाची जाहीर माफी मागवी अशीही मागणी त्यांनी केली.
ADVERTISEMENT