समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे राष्ट्रवादीचे नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक अडचणीत येण्याची शक्यता आहे. समीर वानखेडे यांच्या तक्रारीची दखल घेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने महाराष्ट्र पोलिसांना नवाब मलिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. आदेश मिळाल्यानंतर तास दिवसांच्या आत गुन्हा दाखल करावा, असंही आयोगाने आदेशात म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
नवाब मलिक यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपांनंतर महसूल गुप्तावार्ता विभागाचे अधिकारी समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे धाव घेतली होती. नवाब मलिकांकडून आपल्या छळ झाला असल्याचं वानखेडे यांनी आयोगाला दिलेल्या तक्रारीत म्हटलेलं आहे.
समीर वानखेडे मुंबई एनसबीच्या संचालकपदी असताना नवाब मलिक यांच्या जावयाला अटक करण्यात आली होती. जावई तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल आणि त्यांनी मिळवलेल्या नोकरीबद्दल प्रश्न उपस्थित केले होते.
समीर वानखेडे हे महार नसून, ते मुस्लीम आहेत. मात्र, वानखेडे यांनी अनुसूचित जाती प्रवर्गात असल्याचं दाखवून नोकरी मिळवल्याचा आरोपही मलिकांनी केला होता. त्यानंतर सरकारने जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी समिती गठीत केली होती.
दरम्यान, मलिकांकडून करण्यात आलेले आरोप आणि जात पडताळणी समितीची नियुक्त करण्यात आल्यानंतर वानखेडे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचा दरवाजा ठोठावला होता. ‘मलिक हे आपला छळ करत असून माझ्या जातीबद्दल चुकीचं बोलत आहेत. पत्रकार परिषदा आणि सार्वजनिक सभामधून, त्याचबरोबर सोशल मीडियातून माझ्याबद्दल आणि माझ्या कुटुंबाबद्दल मलिक बोलले आहेत,’ असं वानखेडे यांनी तक्रारीत म्हटलेलं आहे.
वानखेडे यांनी वकील दिवाकर राय यांच्यामार्फत तक्रार दाखल केली आहे. मी आणि माझं कुटुंब हिंदू आहे आणि हिंदूच राहणार आहे. श्रद्धेनं अथवा कृतीने आम्ही कधीही मुस्लिम नव्हतो. आम्ही हिंदू धर्माचं पालन केलं असून, करतच राहणार आहोत. जात प्रमाणपत्र खोटं असल्याचं दाखवण्यासाठी मलिकांनी आमच्या धार्मिक श्रद्धांवर शंका उपस्थित केली आहे. हे निंदनीय असून, मी त्यांच्या जावयाला अटक केल्याचा बदला घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या जावयाकडे मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आढळून आले होते आणि एनडीपीएस कायद्यानुसार अटक करण्यात आली होती,’ असंही वानखेडेंनी म्हटलं आहे.
समीर वानखेडे यांची आत्या गुंफाबाई गंगाधर भालेराव यांनीही आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. गुंफाबाई भालेराव यांनी औरंगाबादमधील मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात नवाब मलिक यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल केली होती. त्यांचीही छळवणूक करण्यात आल्याचं वानखेडे यांनी म्हटलं आहे. आपल्या आत्याला कर्करोगाने ग्रासलेलं असून, त्यांना मुंबईपर्यंत प्रवास करणं शक्य नव्हतं. एसआयटीसमोर साक्ष नोंदवण्यासाठी त्यांना औरंगाबादमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यांना मुंबईतील बोरिवली पोलीस ठाण्यात बोलवण्यात आलं होतं. त्याचबरोबर माझ्या आत्याचं संपूर्ण जबाब न नोंदवता मध्येच रेकॉर्डिंग बंद करण्यात आल्याचा आरोपही वानखेडेंनी केलेला आहे.
एसआयटी चौकशी आणि मलिक यांच्याकडून झालेल्या छळाच्या प्रकरणात आयोगाने लक्ष घालावं आणि आपल्याला न्याय द्यावा, असंही वानखेडे यांनी म्हटलं आहे. नवाब मलिक हे कॅबिनेट मंत्री आहेत आणि त्यांच्या पदाचा वापर करून ते चौकशी प्रभावित करू शकतात. त्यामुळे निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी आयोगाकडून स्वतंत्रपणे चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही वानखेडे यांनी केली आहे.
समीर वानखेडे यांच्या तक्रारीची दखल घेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने महाराष्ट्र पोलिसांना सात दिवसांच्या आत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर राज्य सरकारने स्थापन केलेल्या एसआयटी चौकशी अहवाल पुढील सुनावणीवेळी सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील सुनावणी 7 मार्च रोजी होणार आहे.
ADVERTISEMENT