बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) अनिल देशमुख (Anil Deshmukh) प्रकरणात माफीचा साक्षीदार होणार आहे. या प्रकरणी सीबीआयने हिरवा कंदिल दिला आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्यास सचिन वाझेला सीबीआयने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत, सचिन वाझेने या प्रकरणी कायदेशीर अटी आणि इतर प्रक्रिया पूर्ण कराव्यात असंही सीबीआयने म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख हे कोठडीत आहेत. १ नोव्हेंबर २०२१ ला ते ईडीसमोर हजर झाले त्यांची सखोल चौकशी केल्यानंतर त्याच दिवशी त्यांना अटक करण्यात आली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र गेल्या वर्षी मार्च महिन्यात लिहिलं होतं. त्यात त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर दोन प्रमुख आरोप केले होते. त्यातला पहिला आरोप होता तो म्हणजे अनिल देशमुखांनी सचिन वाझेला मुंबईतल्या बार आणि रेस्तराँमधून १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं. तसंच ते पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्या यामध्ये ढवळाढवळ करतात.
परमबीर सिंग यांनी जो लेटरबॉम्ब टाकला त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. हे सगलं प्रकरण कोर्टात गेलं, त्यानंतर सीबीआय चौकशीचे आदेश कोर्टाने दिले. ज्यानंतर अनिल देशमुख यांनी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात राजीनामा दिला होता. या सगळ्या प्रकरणी मनसुख हिरेन प्रकरणात हात असलेला सचिन वाझे माफीचा साक्षीदार होण्यास तयार आहे. सचिन वाझेची सोमवारी कोर्टासमोर साक्ष होणार आहे त्यात तो काय बोलणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
सीबीआय प्रकरणात देशमुख यांना ४ एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. तर सचिन वाझेने भारतीय दंड संहितेच्या कलम 306 अंतर्गत माफीसाठी न्यायालयात अर्ज केला ज्यामध्ये त्यांनी सांगितले की त्यांनी पूर्ण सहकार्य केले आहे आणि एजन्सीने मॅजिस्ट्रेटसमोर त्यांचे म्हणणेही नोंदवले आहे.
२०२१ च्या अँटेलिया स्फोट प्रकरणी आणि व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने सचिन वाझे आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे सचिन वाझे तुरुंगात आहे. आता सचिन वाझे काय बोलणार आणि त्यातून काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT