मुंबई: ‘आपल्याला पुन्हा लॉकडाऊन पाहिजे की काही थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे हे जनतेने ठरवायचे आहे.’ असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाबाबत लोकांमध्ये असणाऱ्या बेफिकीरीबाबत प्रचंड चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाला पुन्हा एकदा कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. कोविडविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यातील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली तेव्हा त्यांनी अशाप्रकारचे आदेश दिले आहेत.
ADVERTISEMENT
‘लोक मास्क घालत नाहीत किंवा आरोग्याचे नियम पाळत नसतील तर जिल्हा आणि पोलीस प्रशासनावर हे नियम काटेकोरपणे अंमलात आणण्याची जबाबदारी आहे. त्यांनी अजिबात शिथिलता न दाखवता कडक दंडात्मक व आवश्यक कारवाई केलीच पाहिजे.’ असे थेट निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
याकडेही लक्ष द्या: कोरोना गेलाय अशा थाटात वागू नका, नाहीतर…
पाहा आजच्या बैठकीत मुख्यमंत्री काय म्हणाले त्यातील 5 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आपण वाचलेच पाहिजेत:
1. कोरोनाचा संसर्ग वाढत असेल त्या भागात किंवा परिसरात टार्गेटेड पद्धतीने तपासण्या करा. एकेका रुग्णांचे किमान 20 तरी संपर्क शोधलेच पाहिजेत. सर्व काही व्यवहार सुरू झाले आहेत, निर्बंध शिथिल केले आहेत त्यामुळे तरुण वर्ग घराबाहेर पडला आहे. त्यात जणू काही कोरोना संपला असे सगळे वागत आहेत, परिणामतः आपल्याच घरातील वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांना आपण धोक्यात आणतो आहोत.
2. मधल्या काळात आपण ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राबवून राज्याचा आरोग्य नकाशा तयार केला. यातील सहव्याधी रुग्णांची परत आरोग्य कर्मचाऱ्यांनी विचारपूस सुरू करा. ज्या-ज्या व्यावसायिक संस्था, संघटना लॉकडाऊन उठविण्यासाठी आपणाकडे येत होत्या त्या सर्व संबंधित संस्था, संघटना यांच्याशी परत एकदा बोलून एसओपीची काटेकोर अंमलबजावणी होईल याची खात्री करून घ्या.
3. जिथे कंटेनमेंट आवश्यक आहे तिथे ते करा व त्याची अंमलबजावणी करा. गेले वर्षभर आपण कोरोनाशी लढताना विविध क्षेत्रांसाठी नियम ( एसओपी) ठरवले आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही हे गंभीर आहे. विशेषतः इतके दिवस थांबलेले लग्न समारंभ सुरू झाले आहेत, लोकांच्या गाठीभेटी, पार्ट्या व इतर सामाजिक कार्यक्रम कुठल्याही आरोग्याच्या नियमविना होताना दिसतात. उपाहारगृह, हॉटेल्सच्या वेळा आपण वाढविल्या आहेत मात्र नियमांचे पालन होतांना दिसत नाही. स्थानिक प्रशासनाच्या पथकांनी अशा सर्व ठिकाणी भेटी देऊन तात्काळ कारवाई केली पाहिजे.
4. ज्या विवाह किंवा इतर समारंभात मास्क व इतर नियम पाळलेले दिसणार नाहीत त्या हॉल्स किंवा सभागृहांवर परवाने रद्द करण्याची कडक कारवाई प्रसंगी केली पाहिजे. लोकांमध्ये बेफिकिरी आली असली तरी स्थानिक प्रशासन व पोलिसांत कर्तव्यात ढिलाई नको. हॉटेल्स, उपाहारगृहे यांना वेळा वाढवून दिल्या आहेत मात्र नियम पाळत नसतील तर लगेच कडक कारवाई करा.
ही बातमी जरुर पाहा: …तर त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागेल: अजित पवार
5. सार्वजनिक ठिकाणी पालिकांनी जंतुनाशक फवारणी नियमित करणे सुरू करावी गावागावात जाऊन फिरत्या वाहनाद्वारे लोकांच्या चाचण्या वाढवा. ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या फिल्ड हॉस्पिटलमधील सर्व यंत्रणा व्यवस्थित सुरू आहेत का याची खात्री करा. ही सुविधा वापरण्याची वेळ येऊ नये पण तयारीत राहा.
ADVERTISEMENT