Bird flu :
ADVERTISEMENT
चिलीमध्ये एका व्यक्तीला बर्ड फ्लूची (bird flu) लागण झाल्याचं आढळून आलं आहे. चिलीमध्ये मानवाला बर्ड फ्लूची लागण झाल्याची ही पहिलीच घटना आहे. याबाबत चिलीच्या आरोग्य मंत्रालयानं एक निवेदन जारी करत म्हटलं की, 53 वर्षीय व्यक्तीला बर्ड फ्लूची लागण झाली आहे. मात्र, त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याला संसर्ग कसा झाला आणि तो कोणाच्या संपर्कात आला हे शोधण्याचा सरकार आता प्रयत्न करत आहे. (what is this bird flu? How dangerous is this? And what is the risk of humans getting infected?)
गेल्या वर्षाच्या अखेरीपासून चिलीमध्ये H5N1 बर्ड फ्लूची प्रकरणं समोर येत आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा विषाणू पक्ष्यांमधून किंवा समुद्रातील प्राण्यांमधून माणसात पसरू शकतो, मात्र माणसातून माणसात पसरल्याचा कोणताही पुरावा अद्याप उपलब्ध नाही. या वर्षाच्या सुरुवातीला इक्वाडोरमध्ये एका 9 वर्षांच्या मुलीला बर्ड फ्लूची लागण झाली होती.
मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर बर्ड फ्लू नेमका काय आहे? तो किती धोकादायक आहे? आणि मानवाला संसर्ग होण्याचा धोका किती आहे? हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
बर्ड फ्लू म्हणजे काय?
– बर्ड फ्लूला एव्हियन इन्फ्लूएंझा असेही म्हणतात, जे एक व्हायरल इन्फेक्शन आहे. हा आजार पक्ष्यांकडून पक्ष्यांमध्ये पसरतो आणि बहुतेक पक्ष्यांसाठी घातक देखील ठरतो.
– यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC) नुसार, बर्ड फ्लू सामान्यतः पाळीव पक्ष्यांमध्ये जंगली पक्ष्यांमधून पसरतो. हा विषाणू पक्ष्यांच्या आतड्यांवर किंवा श्वसन प्रणालीवर हल्ला करतो आणि त्यांना आजारी पाडतो. अनेक प्रकरणांमध्ये पक्ष्यांचा यामुळे मृत्यूही होतो.
– हा विषाणूही सामान्य व्हायरसप्रमाणे पसरतो. सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या दाव्यानुसार, संसर्ग झालेल्या पक्ष्याच्या नाकातून बाहेर पडणारी लाळ किंवा विष्ठेतून हा विषाणू पसरू शकतो. अशा परिस्थितीत जेव्हा दुसरा पक्षी त्याच्या संपर्कात येतो तेव्हा त्यालाही संसर्ग होऊ शकतो.
हा विषाणू माणसातही पसरू शकतो का?
– जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, बर्ड फ्लू किंवा एव्हियन फ्लू हा ए प्रकारातील इन्फ्लूएंझा व्हायरस आहे. हा मानवांना तसंच प्राण्यांना संक्रमित करू शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती संक्रमित पक्ष्याच्या थेट संपर्कात येते, तेव्हा बर्ड फ्लूची लागण होण्याचा धोकाही वाढतो.
– सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत मानवाला बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याची काहीच प्रकरणे समोर आली आहेत. पण माणसांनाही बर्ड फ्लूची लागण होऊ शकते.
– बर्ड फ्लूचा सर्वात धोकादायक विषाणू H5N1 आहे. H5N1 ची लागण झाल्यानंतर बहुतेक लोकांचा मृत्यू होतो.
हा विषाणू माणसांमध्ये कसा पसरू शकतो?
– जर हा विषाणू हवेत असेल तर तिथं श्वास घेऊनही माणसाला बर्ड फ्लूची लागण होऊ शकते. याशिवाय डोळे, नाक किंवा तोंडातूनही हा विषाणू शरीरात प्रवेश करू शकतो. जर एखाद्या व्यक्तीने संक्रमित ठिकाणी स्पर्श केल्यासही विषाणू पसरण्याचा धोका वाढतो.
– डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, 1997 मध्ये पहिल्यांदाच एखाद्या व्यक्तीला बर्ड फ्लू (H5N1) ची लागण झाल्याचं प्रकरण हाँगकाँगमध्ये समोर आलं होतं. 2003 पासून, आशिया, युरोप आणि आफ्रिकेतही बर्ड फ्लूची लागण झाल्याची प्रकरणं नोंदवली गेली आहेत.
बर्ड फ्लूयाची लक्षणे काय आहेत?
– जर एखाद्या व्यक्तीला बर्ड फ्लूची लागण झाली असेल, तर सौम्य ते गंभीर लक्षणं दिसू शकतात. अतिसार, वाहणारे नाक, उलट्या अशी सौम्य लक्षण जाणवतात.
– संक्रमित लोकांना ताप, खोकला, घसा खवखवणे, नाक वाहणे, स्नायू किंवा अंगदुखी, डोकेदुखी, थकवा, श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो.
– गंभीर लक्षणांमध्ये ताप किंवा न्यूमोनिया होऊ शकतो, त्यामुळे रुग्णाला रुग्णालयात दाखल करावं लागू शकतं. अनेक प्रकरणांमध्ये मृत्यू देखील ओढावू शकतो.
बर्ड फ्ल्यू एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकतो का?
– सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या दाव्यानुसार, एखाद्या व्यक्तीला बर्ड फ्लूची लागण झाली असेल, तर दुसऱ्या व्यक्तीला त्याचा संसर्ग होणे अत्यंत दुर्मिळ आहे.
– एखाद्या व्यक्तीला बर्ड फ्लूची लागण झाली असली तरी तो त्याचा संसर्ग जास्त पसरवू शकत नाही, म्हणजेच जास्त लोकांना संक्रमित करू शकत नाही.
– मात्र बर्ड फ्लूचा विषाणू वेगाने म्यूटेट होतो, त्यामुळे लोकांमध्ये सहज पसरण्याची शक्यता असते.
– पोल्ट्री फार्म किंवा कत्तलखान्याच्या आसपास राहणाऱ्या लोकांना बर्ड फ्लूची लागण होण्याचा धोका सर्वाधिक असतो.
बर्ड फ्लू चिकन आणि अंडी खाल्ल्याने पसरू शकतो का?
– बर्ड फ्लू कोणत्याही ठिकाणी पसरला तर त्याच्या आसपासच्या भागात मांस आणि अंडी विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. बोकारोमध्येही असाच प्रकार घडला आहे. चिकन आणि अंडी विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. अशा काळात चिकन आणि अंडी खाणं टाळावं, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
– वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अॅनिमल हेल्थ आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या दोघांनीही हे स्पष्ट केलं आहे की मांस आणि अंडी योग्य प्रकारे स्वच्छ केल्यास किंवा उकळवून शिजवल्यास ते खाण्यास सुरक्षित आहेत.
बर्ड फ्लूवर उपचार काय?
– एखाद्या व्यक्तीला बर्ड फ्लूची लागण झाली असेल, तर त्यावर अँटीव्हायरल औषधांनी उपचार करता येतात.
– डब्ल्यूएचओच्या मते, संक्रमित व्यक्तीवर किमान पाच दिवस उपचार केले पाहिजेत. त्याच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्यास उपचार आणखी काही दिवस केले पाहिजेत.
कोणती खबरदारी घ्यावी लागेल?
– छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात घेतल्यास बर्ड फ्लूचा संसर्ग टाळता येऊ शकतो. WHOच्या मते, व्हायरसपासून वाचण्यासाठी आपले हात वारंवार धुवा, खोकताना किंवा शिंकताना नाक आणि तोंड झाकून बारला स्पर्श करणं टाळावं. याशिवाय पोल्ट्री फार्म, पोल्ट्री मार्केट किंवा पक्ष्यांची कत्तल होत असलेल्या ठिकाणी जाणं टाळावं.
ADVERTISEMENT