CM एकनाथ शिंदे सातारच्या दौऱ्यावर; मूळ गावी ग्रामदैवत उतेश्वरच्या चरणी लीन

इम्तियाज मुजावर

01 Nov 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:41 AM)

सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसीय सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी रात्री या दौऱ्यात त्यांनी महाबळेश्वर तालुक्यातील दरे या मूळ गावी जाऊन ग्रामदैवत उतेश्वरचे दर्शन घेतले. त्यानंतर गावातच त्यांनी मुक्काम केला. मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे यांचा हा दुसरा दौरा आहे. मागील दौऱ्याच्या वेळी पावसाळा असल्याने त्यांना देवाचे दर्शन घेता आलं नव्हतं. यावेळी गावकऱ्यांनी गावच्या […]

Mumbaitak
follow google news

सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसीय सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी रात्री या दौऱ्यात त्यांनी महाबळेश्वर तालुक्यातील दरे या मूळ गावी जाऊन ग्रामदैवत उतेश्वरचे दर्शन घेतले. त्यानंतर गावातच त्यांनी मुक्काम केला. मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे यांचा हा दुसरा दौरा आहे. मागील दौऱ्याच्या वेळी पावसाळा असल्याने त्यांना देवाचे दर्शन घेता आलं नव्हतं. यावेळी गावकऱ्यांनी गावच्या सुपुत्राचे जल्लोषात स्वागत केलं.

हे वाचलं का?

दरम्यान, या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी महाबळेश्वर, पाचगणीसह सातारा जिल्ह्यातील ‘क’ वर्ग पर्यटन तसेच धार्मिक आणि यात्रा स्थळांच्या विकास कामांचा आढावा घेतला. या दरम्यान बोलताना त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवरही भाष्य केले. ते म्हणाले, राज्यात प्रकल्प येण्यासाठी मी आणि फडणवीस प्रयत्न करत असून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आमचा सातत्याने संपर्क असून केंद्रीय मंत्र्यांशी देखील राज्याच्या विकासाच्या बाबत आम्ही संपर्कात आहोत.

पुढील काळामध्ये लवकरच आम्ही नवीन मोठमोठे प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आणू. राज्यातून जे प्रकल्प गेले असा आरोप सुरू असून याला जबाबदार कोण आहे यावर मी आता सविस्तरपणे बोलणार नाही. ते उपमुख्यमंत्री यांनी विस्तृतपणे मांडले असून याबाबत मला कोणतेही राजकारण करायचं नाही, असेहा मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याविषयी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना ग्रामस्थ म्हणाले की, खूप दिवसांनी शिंदे साहेब गावांत दाखल झाले आहेत, त्याचा आम्हाला आनंद आहे. इथले रस्ते आणि पुलांची कामं साहेबांनी मार्गी लावली आहेत. तसंच शिक्षणाच्या सोयीसाठी ते शिक्षण संस्था सुरू करत आहेत. पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी स्कुबा डायव्हिंगची सोय करणार आहेत. या भागाच्या पर्यटनाच्या दृष्टीने विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष दिले आहे.

    follow whatsapp