महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अधिवेशनात येतील अशी चर्चा पहिल्या दिवसापासून होती. मात्र शेवटचा दिवस झाला अधिवेशनाचं सूप वाजलं तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सभागृहात आले नाहीत. दोन आमदारांचा निरोप समारंभ सोमवारी पार पडला किमान त्यावेळी तरी ते येतील अशी अपेक्षा होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रकृतीच्या कारणामुळे अधिवेशनात आले नाहीत. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी खोचक शब्दात टीका केली आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात कोव्हिडचा संसर्ग वाढू लागल्याने मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता, दिले महत्त्वाचे निर्देश
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कॅबिनेटच्या बैठकीत व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले होते. तसंच त्यांनी टास्क फोर्सची बैठकही ऑनलाईन पद्धतीने घेतली. मात्र संपूर्ण अधिवेशनात ते प्रत्यक्ष कुठेच आले नाहीत. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
‘”शेवटच्या दिवशी इथे कौरवसभा होणार आहे, हे मुख्यमंत्र्यांना माहीत असावं . कौरवसभेत जी भूमिका धृतराष्ट्राला बजावावी लागली होती, ती आपल्याला करावी लागू नये म्हणून कदाचित तर आले नसावेत.’ असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या मदतीला अजित पवार…आणि भास्कर जाधवांनी मागितली माफी
महाविकास आघाडी सरकार जेव्हापासून सत्तेत आलं आहे तेव्हापासून महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी भाजप सोडताना दिसत नाही. या अधिवेशनातही महाविकास आघाडीने स्थगित केलेले प्रकल्प, विद्यापीठ विधेयक, शेतकऱ्यांचे प्रश्न, कोव्हिडमधला भ्रष्टाचार, मुंबई महापालिकेत करण्यात आलेले घोळ, सहकार खात्याच्या कायद्यातील सुधारणा या सगळ्यातून देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर चांगलाच शाब्दिक हल्ला चढवला. पहिल्या दिवशी भास्कर जाधव आणि त्यांच्यातल्या वादात रंगलेला बघायला मिळाला. मागच्या दोन अधिवेशनांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित होते. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर दिलं होतं. मात्र यावेळी प्रकृतीच्या कारणामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत.
१० नोव्हेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एच एन रिलायन्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना 21 दिवसांनी म्हणजेच डिसेंबर महिन्यात डिस्चार्ज देण्यात आला. अधिवेशनात ते कधी येणार? हा प्रश्न विचारला जात होता. आजही हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना धृतराष्ट्राची उपमा दिली. भाजप आणि शिवसेना यांच्यातलं हे महाभारत आजचं नाही हे महाराष्ट्राला ठाऊक आहेच. महाविकास आघाडी सरकारमधल्या मंत्र्यांना कौरवसभा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना धृतराष्ट्र अशी उपमा दिल्याने आता शिवसेनेकडूनही याचं प्रत्युत्तर दिलं जाईल. ते काय असणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT