नवी दिल्ली: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पुन्हा भाजपशी जवळकी वाढू लागली आहे का? अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आज (26 सप्टेंबर) राजधानी दिल्लीत नक्षलग्रस्त राज्यातील मुख्यमंत्र्यांची विशेष बैठक बोलावली होती. याच बैठकीनंतर अमित शाह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत एकाच टेबलावर जेवणही घेतलं. ज्याचा फोटो आता समोर आल्यानंतर दिल्लीच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
ADVERTISEMENT
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत नक्षलग्रस्त राज्यांमधील मुख्यमंत्र्याची बैठक बोलावली होती. याच बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील हजर होते. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे देखील उपस्थित होते.
नक्षलग्रस्त भागातील अडचणी, तेथील नक्षली कारवाया रोखण्यासाठी उपाय आणि नक्षलग्रस्त ग्रामीण भागाचा विकासासाठी निधी या सगळ्यावर सविस्तर चर्चा झाली. ही बैठक तब्बल साडेतीन तास सुरु होती. ज्यानंतर अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांसोबत लंच घेतलं.
दरम्यान, या बैठकीनंतर एका टेबलावर अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवराज सिंह चौहान, नितीश कुमार आणि चंद्रशेखर राव हे लंचसाठी एकत्र बसलेले पाहायला मिळाले.
यावेळी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही तरी सांगत होते. त्याचवेळी अमित शाह हे देखील चौहान यांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकत होते. दरम्यान, या सगळ्या नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समजू शकलेलं नाही.
अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात वेगळी चर्चा?
भाजपचे ज्येष्ठ आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जी बैठक आयोजित केली होती त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. राजकीय वर्तुळात अशीही चर्चा सुरु होती की, या दोन्ही नेत्यांमध्ये एकांतात काही गोष्टींवर चर्चा देखील होऊ शकते.
मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केवळ लंच दरम्यानच उद्धव ठाकरे आणि अमित शाह हे एकमेकांशी संवाद साधत होते. या दोन्ही नेत्यांमध्ये वेगळी किंवा बंद दाराआड कोणतीही चर्चा झालेली नाही. मात्र, असं असलं तरीही मागील काही दिवसात उद्धव ठाकरे भाजपमधील सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असल्याची जोरदार चर्चा आहे.
‘सरकार टिकवायचं की नाही, हे मुख्यमंत्र्यांच्या हातात’; शिवसेनेच्या माजी मंत्र्यांचं मोठं विधान
राज्यात 2019 विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावरुन भाजप आणि शिवसेनेची ताटातूट झाली होती. ज्यानंतर महाविकास आघाडी स्थापन करुन शिवसेनेनं मुख्यमंत्री पद मिळवलं होतं. असं असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजधानी दिल्लीत देखील संवाद ठेवून भविष्यातील राजकारणाला दिशा देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अमित शाह यांच्यासोबत जेवणाच्या टेबलावर नेमका काय राजकीय बेत शिजला हे आपल्याला येत्या काही दिवसात नक्कीच समजू शकेल.
ADVERTISEMENT