MPSC चा विद्यार्थी ज्याने परीक्षा दिल्यानंतर दोन वर्षे नोकरी मिळेल याची वाट पाहिली. मात्र नोकरी न मिळाल्याने त्याने आत्महत्या केली. स्वप्नील लोणकर हा पुण्याचा तरूण होता. या मायाजालात फसू नका असं लिहून या तरूणाने आपलं आयुष्य संपवलं. यानंतर भाजपने महाविकास आघाडी सरकारवर बरीच टीकाही केली होती. आता आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वप्नील लोणकच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
ADVERTISEMENT
काय म्हणाले मुख्यमंत्री?
‘आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत..काळजी करू नका,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांना धीर दिला.
स्वप्नील लोणकर यांचे आई, वडील आणि बहिण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वप्नीलचे आई, वडीलांचे सांत्वनही केले. तसेच स्वप्नीलची बहिणीला करता येईल, ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वस्तही केले. तिचे शिक्षण आणि पात्रतेनुसार तिला रोजगार संधी उपलब्ध करून देता येईल यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही स्वप्नीलच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती
याप्रसंगी विधान परिषदेच्या उपाध्यक्ष डॉ. नीलमताई गोऱ्हे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार सर्वश्री अनिल देसाई, विनायक राऊत, शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख महेश पासलकर, सामाजिक कार्यकर्त्या कल्याणी वाघमोडे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वनीलच्या आई सौ. छाया, वडील सुनील तसेच बहीण पूजा यांची आस्थेवाईक विचारपूसही केली. घटना दुर्देवी आहे. पण धीराने घ्यावे लागेल. आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत. काळजी करू नका, असा धीर दिला.
काय आहे स्वप्नील लोणकर आत्महत्या प्रकरण?
4 जुलैला पुण्यातील स्वप्नील लोणकर या तरूणाने आत्महत्या केली. MPSC ची परीक्षा पास होऊनही नोकरी मिळत नसल्याने त्याने नैराश्यातून हे पाऊल उचललं.
स्वप्नीलची सुसाईड नोट
‘MPSC हे मायजाल आहे यात पडू नका ! येणार्या प्रत्येक दिवसा सोबत वय आणि ओझं वाढत जातं. Confidence तळाला पोहोचतो आणि self doubt वाढत जातो. 2 वर्षे झालेत pass out होऊन आणि 24 वय संपत आलंय, घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेल कर्ज, खासगी नोकरी करून कधी ही न फिटू शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना! कोरोना नसता, सर्व परीक्षा सुरळीत झाल्या असत्या. तर आज आयुष्य खूप वेगळं आणि चांगल असतं. हवं ते ठरवलं ते प्रत्येक साध्य झालं असतं. मी घाबरलो, खचलो असं मुळीच नाहीये. फक्त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता.’ अशी सुसाईड नोट लिहून स्वप्नील लोणकर याने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं.
ADVERTISEMENT