महाराष्ट्रात होणाऱ्या राज्यसभेच्या पोट निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवार रजनी पटेल यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात या दोघांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतले इतर दोन पक्ष नाराज झाल्याची चर्चा रंगली आहे. तसंच आघाडीत बिघाडी होण्यासाठी हा नवा विषय ठरणार का? याचीही चर्चा सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT
काँग्रेसला महाविकास आघाडीवर विश्वास उरला नाही का…? ज्यामुळे अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन विनंती करावी लागते आहे? असा प्रश्न सत्तेतले इतर दोन पक्ष विचारत आहेत असं कळतंय. सूत्रांनी दिलेल्या माहीती नुसार विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यसभा पोट निवडणूक बिनविरोध करायची असेल तर त्या बदल्यात भाजपच्या निलंबीत 12 आमदारांचं निलंबन रद्द करण्याची मागणी केलीय.
या साठमारीच्या राजकारणामुळे आणि काँग्रेस नेत्यांच्या आजच्या प्रयत्नामुळे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
काँग्रेसने रजनी पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. रजनी पाटील यांच्या विरोधातील उमेदवारी अर्ज भाजपनं मागे घ्यावा ही विनंती करण्यासाठी नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी चंद्रकांत पाटीलही तिथे उपस्थित होते.
महाराष्ट्राची परंपरा ही आहे की एखाद्या नेत्याच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर विरोधात उमेदवार दिला जात नाही. त्यामुळे भाजपने अर्ज मागे घ्यावा ही विनंती आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आम्हाला खात्री आहे की आमच्या विनंतीचा मान ठेवला जाईल, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली. तर संघटनेत चर्चा करुन फडणवीस निर्णय घेतील असं त्यांनी सांगितल्याचं देखील पटोलेंनी स्पष्ट केलं.
काय घडलं होतं 5 जुलैला?
5 जुलैला विधानसभेचं कामकाज सुरू असताना डॉ. संजय कुटे, अॅड. आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, अॅड. पराग अळवणी, हरिश पिंपळे, राम सातपुते, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, किर्तीकुमार उर्फ बंटी बागडिया यांनी सभागृहात गैरवर्तन केलं. सभागृहात पीठासीन अधिकाऱ्यांना उद्देशून अर्वाच्च भाषण केलं. माईक आणि राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला. वारंवार सूचना देऊनही सभागृह तहकूब झाल्यानंतरही माननीय अध्यक्षांच्या दालनात पुन्हा एकदा सगळ्या सदस्यांनी गैरवर्तन केलं होतं. ज्यानंतर या सगळ्यांचं निलंबन करण्यात आलं. हे निलंबन मागे घेण्याची मागणी फडणवीस यांनी केल्याचं समजतं आहे.
ADVERTISEMENT