धावती ट्रेन पकडणं किंवा धावत्या ट्रेनमधून उतरणं हे प्रवाशांच्या जिवाला धोकादायक आहे ही सूचना आतापर्यंत आपण अनेकदा ऐकली असेल. रेल्वे प्रशासन वारंवार असे प्रकार करण्यापासून प्रवाशांना रोखत असतं. अनेकदा धावती ट्रेन पकडण्याच्या किंवा धावत्या ट्रेनमधून उतरण्याच्या नादात अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. मध्य रेल्वेतील कल्याण रेल्वे स्थानकात गुरुवारी असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
ADVERTISEMENT
धावत्या एक्सप्रेस गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करत असताना तोल जाऊन एका कंत्राटदाराला आपले प्राण गमवावे लागले आहेत. कल्याण रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर हा अपघात घडला. जो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंत्राटदार प्रदीप भंगाळे भुसावळवरुन कल्याणच्या दिशेने प्रवास करत होते. प्रदीप भंगाळे हे ठेकेदार असून ते महापालिकेतली ठेक्याची कामं करतात. कल्याणला न थांबणाऱ्या एका एक्सप्रेस ट्रेनमधून त्यांनी स्टेशनवर उतरण्याचा प्रयत्न केला. परंतू गाडीच्या वेगाचा अंदाज न आल्यामुळे प्रदीप भंगाळे हे थेट फलाट आणि गाडीच्या मधल्या अंतरात अडकले.
यानंतर दरवाजाचा धक्का लागून ते थेट ट्रॅकखाली आल्यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. रेल्वे पोलिसांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून या अपघाताच्या निमीत्ताने धावत्या ट्रेनमधून उतरणे किंवा धावती ट्रेन पकडणे असे प्रकार प्रवाशांनी टाळावेत असं आवाहन रेल्वे पोलिसांनी केलं आहे.
ADVERTISEMENT