दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर: प्रेम विवाहाला विरोध केल्यानं अहमदनगर जिल्हयातील प्रेमी युगुलानं टोकाचं पाऊल उचललं आहे. कोल्हापुरात देव दर्शनासाठी आलेल्या राहुल मच्छे आणि प्रियंका भराडे या प्रेमी युगुलानं महालक्ष्मी अंबाबाई मंदिराजवळच्या एका धर्मशाळेत गळफास लावून आत्महत्या केली आहे. या दोघांच्या मृतदेहाजवळ चिठ्ठी सापडल्यानं या दोघांच्या आत्महत्येचं कारण स्पष्ट झालं आहे.
ADVERTISEMENT
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील तामसवाडी इथं राहणारं एक प्रेमी युगुल 31 डिसेंबरला कोल्हापुरात आलं होतं. अंबाबाई मंदिराजवळील ताराबाई रोडवर असलेल्या एका धर्मशाळेत ते राहिले होते. कोल्हापुरात देव दर्शनासाठी आलो असून, आम्ही दोन दिवस राहणार आहोत, असं त्यांनी धर्मशाळेचे व्यवस्थापक रवी सलुजा यांना सांगितलं होतं.
रुम घेतल्यानंतर तब्बल दोन दिवस हे प्रेमी युगुल रूमच्या बाहेरच आले नसल्याचं व्यवस्थापक सलुजा यांच्या लक्षात आलं. त्यामुळे आज (3 डिसेंबर) त्यांनी प्रेमी युगुल असेलल्या त्यांच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. पण बराच वेळ झाला तरी आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांना काहीसा संशय आला त्यामुळं त्यांनी जुना राजवाडा पोलिसांशी संपर्क साधला.
संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ धर्मशाळेत धाव घेतली आणि खोलीचा दरवाजा उघडला. त्यावेळी दोघांनीही गळफास लावून घेतल्याचं दिसून आलं. यावेळी बेडवर पोलिसांना एक सुसाईड नोट देखील आढळून आली.
‘प्रेमाला घरच्यांचा विरोध असल्यानं आम्ही आमचं जीवन संपवत आहोत.’ असं या सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं.
Jalgaon: प्रेमी युगुलाची शाळेच्या इमारतीत गळफास घेऊन आत्महत्या
दरम्यान, त्यांच्या ओळख पत्रावरून, नातेवाईकांशी संपर्क साधल्यानंतर, मृत प्रियांका भराडेचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाल्याचं समजलं. राहुल मच्छे आणि प्रियांका हे दोघेही एकाच गावात राहत होते. या दोघांचंही एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. पण प्रियांकाच्या घरच्यांनी दुसर्या तरुणाशी तिच्या मनाविरुद्ध विवाह लावून दिला होता. तेव्हापासून प्रियांका आणि राहुल हे दोघेही अस्वस्थ होते. अखेर नगरहून थेट कोल्हापूरला येऊन या दोघांनीही आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवली. या संपूर्ण घटनेमुळे राहुल आणि प्रियांका या दोघांच्याही कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT