ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे भारतासह जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. ओमिक्रॉनच्या गडद होत चाललेल्या संकटात जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) आणखी एका लसीच्या वापराला मंजुरी दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि नोवावॅक्स (Novavax) यांनी तयार केलेल्या लसीला जागतिक आरोग्य संघटनेनं आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. अदर पूनावाला यांनी ट्वीट करून ही माहिती दिली.
ADVERTISEMENT
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी ट्वीट करत आनंद व्यक्त केला. “कोविड विरोधातील आमच्या लढ्यातील आणखी एक मैलाचा दगड. कोव्होव्हॅक्सच्या आपत्कालीन वापराला मंजुरी मिळाली आहे,” असं म्हणत अदर पूनावाला यांनी जागतिक आरोग्य संघटनेनं लशीच्या परवानगी दिल्यानंतर केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
Omicron variant symptoms: ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या लक्षणाबाबत समोर आली नवी माहिती
सीरम इन्स्टिट्यूटने कोव्होवॅक्स लस तयार केली असून, या लस निर्मितीसाठी सीरमला नोव्हावॅक्स कंपनीची साथ लाभली आहे. या लसीचे आतापर्यंत जितक्या चाचण्या झाल्या, त्यामध्ये ही लस कोरोनावर परिणामकारक असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेनं आपत्कालीन वापरासाठी लसीला परवानगी दिली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनं आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिलेली नोव्होवॅक्स ही कोरोनावरील 9वी लस आहे. कमी उत्पन्न गटातील देशांना या लसीचा जास्त फायदा होईल आणि त्या देशांमध्ये कमी वेळेत वेगाने लसीकरण केलं जाईल, असं जागतिक आरोग्य संघटनेनं लसीच्या वापराला मंजुरी देताना म्हटलं आहे.
Omicron : ‘देशातल्या 11 राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा शिरकाव, सर्वात जास्त रूग्ण महाराष्ट्रात’
“कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटच्या संकटात लस हेच एक प्रभावी साधन आहे, जे लोकांना गंभीर आजारांपासून वाचवेल. याचा उद्देश विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये लशीचा पुरवठा पोहोचवणं हा असून, आतापर्यंत अशा 41 देशांमध्ये 10 टक्क्यांपेक्षाही कमी लसीकरण झालं आहे. तर इतर 98 देशांमध्ये लसीकरणाचं प्रमाण 40 टक्केही झालेलं नाही,” असं WHO च्या उपमहासंचालक डॉ. मारियांजेला सिमो यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT