काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या दरम्यान केलेल्या भाषणात वीर सावरकर यांच्यावर यथेच्छ टीका केली. वीर सावरकर हे कसे माफीवीर होते, इंग्रजांकडून भत्ता घेत होते हे आपल्या भाषणात सांगितलं. त्यांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. एवढंच नाही तर वीर सावरकरांना जे लोक शिव्या देतात त्यांच्या गळ्यात गळे घालून आदित्य ठाकरे कसे काय चालतात? हे पाहून स्वर्गात बाळासाहेबांना वेदना होत असतील असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
हिंगोलीत वीर सावरकरांविषयी राहुल गांधी एवढं नीच वक्तव्य करतात. त्याच राहुल गांधींसोबत गळ्यात गळे घालून आदित्य ठाकरे पदयात्रा करतात हे चित्र पाहून आमचं जाऊदे किमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती वेदना होत असतील? असा प्रश्न मला पडतो. वीर सावरकरांचा जाज्वल्य अभिमान बाळासाहेब ठाकरेंना होता. त्यांचे विचार बाळासाहेब ठाकरेंनी पुढे नेले. मात्र आताचं चित्र पाहिलं तर वाईट वाटतं असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्य केलं आहे.
..तर बाळासाहेबांशी नातं कसं काय सांगता?
स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या देणाऱ्यांना तुम्ही जवळ करणार असाल तर बाळासाहेब ठाकरेंशी नातं सांगण्याचा तुम्हाला अधिकार काय? त्यामुळेच इथे बाळासाहेबांची शिवसेना तयार झाली आहे. एकनाथ शिंदे हे रक्ताच्या नात्याने बाळासाहेबांचे काहीही लागत नसतील पण बाळासाहेबांचा विचार ते पुढे घेऊन जात आहेत असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. वीर सावरकरांवर जर टीका केली तर त्यांच्याकडून चपखल अशा पद्धतीने उत्तर दिलं जात होतं. आता मात्र ते चित्र नाही. त्यामुळेच खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचे रक्ताने कुणी लागत नसले तरीही बाळासाहेबांचा विचार तेच पुढे घेऊन जात आहेत. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
वीर सावरकर यांच्याबाबत काय म्हणाले होते राहुल गांधी?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इंग्रजांना मदत करत होता, तर सावरकरांना इंग्रजांकडून भत्ता मिळत होता. हे एतिहासिक तथ्य आहे की, स्वातंत्र्याच्या लढाईत हे कुठेही दिसले नाहीत. हे सत्य भाजपच्या नेत्यांनी मान्य करावं. काँग्रेस पक्षातील नेत्यांनी स्वातंत्र्याच्या लढाईत इंग्रजांविरोधात लढा दिला. अनेक वर्ष त्यांना तुरुंगात राहावं लागलं. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु, वल्लभभाई पटेल यांच्यासह अनेक नेत्यांनी इंग्रजांविरोधात लढा दिला. द्वेष पसरणारे व्यक्ती कोण आहेत आणि ते कोणत्या समाजातून आले, याचा काहीही फरक पडत नाही. द्वेष आणि हिंसा पसरवणे हे देशाविरोधी कार्य आहे. आम्ही त्या प्रत्येक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीविरोधात लढणार आहोत.
ADVERTISEMENT