महाराष्ट्राचं राजकारण सध्या अत्यंत अनप्रेडिक्टेबल झालं आहे. राजकारणात काय होईल याचा अंदाजच लावता येत नाही अशा काही घटना मागच्या काही दिवसांमध्ये घडल्या आहेत. अशात घटनांमध्ये एक महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून लिहिलेलं पत्र. एवढंच नाही तर या पत्राला आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. तसंच हेच पत्र त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही उद्देशून लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी शिवसेनेवर टीका केली असून शिवसेनेने त्यांच्या सोयीप्रमाणे प्रभाग रचना केल्याचं म्हटलं आहे. त्याचा आपण फेरविचार करावा असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. याच पत्राला आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
मिलिंद देवरा यांनी काय म्हटलं आहे?
मिलिंद देवरा यांनी मागच्या अडीच वर्षात पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली. मुंबई तकशी साधलेल्या संवादात मिलिंद देवरा म्हणाले की, मुंबई महापालिका ही भारतातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे. या मुंबई महापालिकेच्या निवडणुका योग्य पद्धतीने घेतल्या पाहिजेत. मुंबईच्या महापालिका निवडणुका निष्पक्षपणे पार पडल्या पाहिजेत. एका पक्षाच्या फायद्यासाठी वॉर्ड रचना बदलणं कितपत योग्य आहे? ही बाब घटनेच्या विरोधात आहे त्यामुळेच मी पत्र लिहिलं आहे. सर्वांनी एकत्र येऊन मुंबईतल्या प्रभाग रचनेसाठी नवी रचना करण्याची मागणी करावी. अशी मागणी मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे.
निवडणुकीची प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पडली पाहिजे. तसंच सर्व पक्षांनी मिळून वॉर्ड रचनेचा फेरविचार केला पाहिजे. यासंदर्भातली मागणी आम्ही आधीही केली होती. आताही करतो आहोत. आम्हाला सरकार आणि कोर्टाच्या माध्यमातून सामान्य मुंबईकरांसाठी न्याय मिळेल ही आशा आहे असंही देवरा यांनी म्हटलं आहे.
मिलिंद देवरा यांच्या म्हणण्याला आणि पत्राला देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर
फडणवीस म्हणतात, “मिलिंद देवराजी सोशल मीडियावर तुम्ही मला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून लिहिलेलं पत्र मिळालं. आम्ही तुमच्या भावना लक्षात घेतल्या आहेत. मुंबईकरांसाठी मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी तुमची जी चिंता आहे ती समजली आहे. ती चिंता दूर करण्याचा प्रयत्न आम्ही पूर्णपणे करू” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडी सरकार असतानाच शिवसेनेने हा निर्णय घेतला होता. या निर्णयाला काँग्रेसने तेव्हाच विरोध दर्शवला होता. मात्र शिवसेनेने एकतर्फी निर्णय घेतला आणि ही प्रभाग रचना केली. आता या प्रभाग रचनेचा सर्व पक्षांनी मिळून विचार करावा ही मागणी आता मिलिंद देवरा यांनी केली आहे.
ADVERTISEMENT