Devendra Fadnavis : विनायक मेटेंना खरंच तासभर मदत मिळाली नाही का?; अपघातानंतर काय घडलं?

मुंबई तक

• 08:08 AM • 22 Aug 2022

विनायक मेटे यांचा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर १४ ऑगस्ट रोजी पहाटे अपघात झाला. अपघात झाल्यानंतर मेटे यांना तासभर मदतच मिळाली नाही, असा दावा त्यांच्या कारचालकाने केला होता. त्यावरूनही प्रश्न निर्माण झाले आहेत. विनायक मेटे यांना मदत मिळण्यास का विलंब झाला आणि यातील दोषींवर कारवाई करण्याबद्दल उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिलं. विनायक मेटे […]

Mumbaitak
follow google news

विनायक मेटे यांचा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर १४ ऑगस्ट रोजी पहाटे अपघात झाला. अपघात झाल्यानंतर मेटे यांना तासभर मदतच मिळाली नाही, असा दावा त्यांच्या कारचालकाने केला होता. त्यावरूनही प्रश्न निर्माण झाले आहेत. विनायक मेटे यांना मदत मिळण्यास का विलंब झाला आणि यातील दोषींवर कारवाई करण्याबद्दल उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिलं.

हे वाचलं का?

विनायक मेटे अपघात : ‘नवी मुंबई पोलिसांकडे कॉल गेला, पण…’

विनायक मेटे यांच्या अपघाताबद्दल माहिती देतानाच देवेंद्र फडणवीस यांनी अपघातानंतर नेमकं काय घडलं याविषयी सभागृहाला सांगितलं. “अपघातानंतर त्यांच्या चालकाने (विनायक मेटे यांचा कारचालक) ११२ नंबरवर कॉल केला. चालकाने सांगितलेल्या ठिकाणाप्रमाणे ११२ नंबरने हा फोन नवी मुंबई पोलिसांकडे हस्तांतरित केला.”

देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले, “माहिती मिळाल्यानंतर नवी मुंबई पोलीस निघाले होते. ते पनवेलच्या पुढेपर्यंत गेले, पण त्यांना काही ते दिसले नाही. तो (विनायक मेटेंचा चालक) सारखा सांगत होता की, बोगद्याजवळ आहे. त्यानंतर एक ते दीड किमी ते पुढे गेले, तरीही ते दिसले नाही. त्यामुळे केलेला फोन खरा की खोटा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला होता. त्यांनी पोलीस स्टेशनला सांगितलं.”

कुणाच्या चुकीमुळे विनायक मेटेंना गमवावा लागला जीव?; फडणवीसांनी सांगितला घटनाक्रम

विनायक मेटे यांच्या कार अपघाताचं ठिकाण कुठे होतं?

“त्याने (विनायक मेटेंचा चालक) पुन्हा कॉल केला. त्यानंतर मग असं लक्षात आलं की, ते ठिकाण अजून पुढे असेल म्हणून मग रायगड पोलिसांना याची माहिती देण्यात आली. रायगड पोलीसही निघाले. ते निघाल्यानंतर त्या ठिकाणी पोहोचले. ते ठिकाण त्यांच्या हद्दीत होतं. चालक भांबावलेला होता की काय माहिती नाही. पण तो ज्याप्रकारे सांगत होता की, बोगद्याच्या बाजूला आहे. पण बोगद्यापासून बरेच दूर ते लोकं होते”, असं फडणवीस म्हणाले.

“नंतर रायगड पोलीस पोहोचले. तोपर्यंत रस्त्याने जाणाऱ्या कुणीतरी ज्या कंपनीकडे याचं व्यवस्थापन आहे, त्या आयआरबीला सांगितलं. आयआरबीला कळल्यानंतर त्यांची गाडी पाच मिनिटात त्या ठिकाणी पोहोचली. त्यांना त्या ठिकाणाहून घेऊन जाण्यात आलं. रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. रस्त्यात झाला की, जागेवर झाला हे आपल्याला पूर्ण चौकशीअंती समजेल”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिली.

विनायक मेटेंची पत्नी अधिकारी, तर मुलं घेताहेत शिक्षण; असं आहे शिवसंग्रामच्या नेत्याचं कुटुंब

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लोकेशन दाखवणारी अत्याधुनिक सिस्टिम आणणार -फडणवीस

सभागृहात निवेदन करताना फडणवीस म्हणाले, “एक गोष्ट निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे की, आपल्याला आपल्या सिस्टीम बदलाव्या लागतील. ११२ नंबरला फोन गेल्यानंतर त्याचं थेट लोकेशन गेलं पाहिजे. त्याने चुकीचा पत्ता सांगितला असला, तरी त्याचं लोकेशन मिळू शकलं असतं. कारण मोबाईलवरून लोकेशन मिळू शकतं. त्यामुळे लोकेशन थेट मिळालं असतं, तर तत्काळ ते रायगड पोलिसांकडे ते गेलं असतं. रायगडचे लोक वेळेत तिथे पोहोचू शकले असते.”

दोषींवर कारवाई होणार -देवेंद्र फडणवीस

“दिरंगाई झालीये का? याची चौकशी केलीये. काही लोकांवर कारवाईही करण्यात येत आहे. कितीही कारवाई केली, तरी गेलेला व्यक्ती परत आणता येणार नाही. भविष्यात अशा प्रकारच्या घटना होऊ नये म्हणून काही उपाययोजना करण्यात येताहेत. त्यामुळे आता लोकेशनच्या आधारावरच ते पोलिसांना कळलं पाहिजे. हद्दीचे प्रश्न येऊ म्हणून हे लोकेशन मिळावे अशी व्यवस्था करण्यात येईल”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“मोठे ट्रेलर्स आहेत, ते लेन सोडून चालतात म्हणून यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलीये आणि लवकरच एक आयटीएमएस सिस्टीम संपूर्ण एक्स्प्रेसवे लागू करणार आहोत. म्हणजे एखादा ट्रॉलर लेन सोडून जात असेल, तर त्याचीही माहिती आपल्याला मिळेल. अशी सिस्टीम त्या रोडवर लावण्याचा प्रयत्न असणार आहे”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

    follow whatsapp