मुंबई : आमदार बच्चू कडू यांनी कोणाशी काही सौदा केला किंवा त्यांनी काही उलटं-सुलटं केलं हे म्हणण चुकीचं आहे, असं सांगत अमरावतीमधील बहुचर्चित रवी राणा विरुद्ध बच्चू कडू वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ते सोमवारी मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी हा विषय आता संपला असल्याचं सांगत या वादावर पडदाही टाकला.
ADVERTISEMENT
बच्चू कडू माझ्या एका फोनवर गुवाहटीला गेले :
बच्चू कडू यांना क्लिन चीट देताना देवेंद्र फडणवीस यांनी कडू यांची शिंदे गटासोबत गुवाहटीला जाण्याची इनसाईड स्टोरीही सांगितली. ते म्हणाले, बच्चू कडू हे माझ्या एका फोनवर गुवाहटीला गेले होते. मी स्वतः त्यांना फोन केला. मी त्यांना सांगितलं की, आम्हाला सरकार बनवायचं आहे आणि तुम्ही आमच्यासोबत हवे आहात. आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आमच्या गटात यावं. त्यानंतर ते गुवाहटीला गेले.
बच्चू कडू यांनी कोणाशी सौदा केला आणि काही उलटं-सुलटं केलं हे म्हणणं चुकीचं आहे. बाकी इतरांचं मी म्हणतं नाही. पण याचा अर्थ इतरांनी काही सौदा केला असा होतं नाही. पण माझ्या फोनवर गेलेले नाहीत. माझ्या फोनवर गेलेले बच्चू कडू हे एकमेवचं, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
माझी पक्की माहिती.. :
सोबतच माझी ही पक्की माहिती आहे की, जे गुवाहटीला गेले ते पूर्णपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेऊन गेले. उद्या जर आवश्यक संख्या नसेल तर आपलं पद जाऊ शकतं, याची सर्वांना कल्पना होती. तरीही पूर्ण विश्वास शिंदे यांच्यावर होता, म्हणून ते गेले.
हा विषय संपला आहे.. :
मी स्वतः आणि मुख्यमंत्र्यांनी रवी राणा आणि बच्चू कडू यांना बोलाऊन घेतलं होतं. आम्ही दोघांशीही चर्चा केली. त्यावेळी रवी राणांनी मान्य केलं की मी हे रागात बोललो, मला तसं बोलायचं नव्हतं, कोणाला दुखवायचं नव्हतं. पण माझ्याविरोधात बच्चू कडू यांनी काही वक्तव्य केली त्यामुळे मी हे रागात बोललो. बच्चू कडू यांनीही हे मान्य केलं की मीही रागारागत बोललो.
दोघांनीही मान्य केलं मी आम्ही केलेली वक्तव्य बरोबर नाहीत. आता दोघांनीही ठरवलं आहे की विकासासाठी काम करायचं आहे. यात दोघांचही भलं आहे. त्यानंतर रवी राणा यांनी दिलगीरी व्यक्त केली. त्यामुळे आता हा विषय संपला आहे.
ADVERTISEMENT