धुळे : शौचालयाबाहेर लघुशंका करीत असल्याने हटकल्याच्या रागातून झालेल्या झटापटीमध्ये तरुणाचा मृत्यू झाला आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात काल (मंगळवारी) रात्री उशीरा ही धक्कादायक घटना घडली. रामभाऊ भगवान माळी (वय – ३६) असं मृतं तरुणाचं नाव आहे. तर, या प्रकरणात मनोज भगवान मराठे असं अटक केलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे.
ADVERTISEMENT
नेमकं काय घडलं?
शहर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, मनोज भगवान मराठे हा तरुण मराठागल्ली जवळ सार्वजनिक शौचालयबाहेर लघुशंका करीत असल्याचं निदर्शनास आलं. यानंतर रामभाऊ माळी यांनी मनोजला हटकलं. रामभाऊ माळी यांच्या या वागण्याचा राग येऊन मनोज मराठेने त्यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली.
याच झटापटीमध्ये सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर आपटल्याने रामभाऊ माळी गंभीर जखमी झाले. घटनेनंतर संशयित मनोज मराठे हा घटनास्थळावरून पसार झाला. त्यावेळी स्थानिकांनी जखमी रामभाऊ माळी यांस रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. याप्रकरणी ज्ञानेश्वर बळीराम रोकडे, रा. मराठा गल्ली, शिरपुर यांनी संशियत मनोजविरुद्ध तक्रार दाखल केली.
त्यानंतर फरार संशयित मनोज मराठेला अवघ्या एका तासातच शोध घेत शहादा रस्त्यावर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी संशयित आरोपी मनोज मराठेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण बाऱ्हे हे पुढील तपास करत आहे.
ADVERTISEMENT