– रोहिदास हतागळे, बीड प्रतिनिधी
ADVERTISEMENT
अनेकदा आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून शहरात किंवा ग्रामीण भागात पालक चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी जिवाचा आटापीटा करण्याचा प्रयत्न करतात. परंतू विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड असेल तर ते जगाच्या कोणत्याही शाळेत चांगला अभ्यास करुन आपलं नाव मोठं करतात. बीडच्या दिलीप वामन शिनगारेनेही हेच उदाहरण एकदम तंतोतंत खरं ठरवून दाखवलं आहे.
बीड जिल्ह्याच्या धारुर तालुक्यातील आरणवाडी या डोंगराळ गावात राहणारा दिलीप आता पीएचडीसाठी थेट सातासमुद्रापार आयर्लंडला जाणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या दिलीपचं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं आहे.
दिलीपच्या घरात आर्थिक परिस्थिती बेताची, परंतू शिक्षणासाठी दिलीपच्या वडिलांनी खासगी सावकाराकडून कर्ज काढून दिलीपचं शिक्षण पूर्ण केलं. आता वडिलांचा हाच भार दिलीप आयर्लंडच्या नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये पीएचडीचं संशोधन करुन हलका करणार आहे. दिलीपनेही हालाकीच्या परिस्थितीवर मात करत औषधनिर्माण शास्त्रात बी.फार्म, एम.फार्म पूर्ण केलं. यानंतर दिलीपची मायक्रोबायलॉजी आणि मोल्युक्युलर बायलॉजी या विषयात पीएचडीचे संशोधनासाठी आयर्लंडच्या गॅलवे येथील नॅशनल युनिव्हर्सिटीसाठी निवड झाली आहे.
दिलीप आयर्लंडमध्ये नॅशनल युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर जेरांड वॉल आणि प्रोफेसर अॅनी मेरी यांच्या नेतृत्वाखाली पीएचडीचं संशोधन करणार आहे. ५ जानेवारीला दिलीप आयर्लंडसाठी रवाना होणार असून या पीएचडीसाठी त्याला महिन्याला चांगली शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. आयर्लंड सरकारच्या महत्वाच्या प्रोजेक्टवर दिलीप आता काम करणार आहे. बायोमटेरियल, मायक्रोबायलॉजी आणि मोल्युक्युलर बायलॉजी या विषयातील मेडिकल डिव्हाईस बनविण्यासाठीचं हे संशोधन असणार आहे. यासाठी दिलीपला १५५० युरो इतकी शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. (भारतीय रुपयांमध्ये अंदाजे १ लाख ६६ हजारांच्या घरात)
दिलीपच्या या यशामुळे सध्या आरणवाडी गावात आनंदाचं वातावरण आहे. हालाखीची परिस्थिती असतानाही आपल्या मुलाने जिद्दीने अभ्यास करत इतका मोठा टप्पा गाठल्याबद्दल दिलीपचे आई-वडीलही खुश आहेत. दिलीपचं सातवीपर्यंतचं शिक्षण गावच्या जिल्हा परिषद शाळेत झालं. यानंतर १२ वी पर्यंतचं शिक्षण त्याने अहमदपूर येथे पूर्ण केलं. यानंतर दिलीपला वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा होता. परंतू इथे अपयश आल्यानंतर दिलीपने नाशिकमध्ये औषधनिर्माण शास्त्रात महाविद्यालयात पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. यानंतर दिलीपने संशोधनात आपलं करिअर करण्याचा निर्णय घेतला.
राष्ट्रीय पातळीवरील गेट परीक्षेत दिलीपने २ हजार ६७ वा रँक मिळवला. या परीक्षेतील यशामुळे त्याला पंजाब राज्यातील मोहाली येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसिटीकल एज्युकेशन अँड रिसर्च (नायपर) संस्थेत औषधनिर्माण शास्त्रच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला. त्याठिकाणी संशोधनात प्रगती केल्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण होताच गुजरात राज्यातील निरमा विद्यापीठात रिसर्च फेलो म्हणून संशोधन सुरू केलं. त्याठिकाणी काही दिवस काम केल्यानंतर पुण्यातील नामांकित राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा ( एनसीएल) संस्थेत एका प्रकल्पात रिसर्च सायंटिस्ट म्हणून काम करीत असतानाच आयर्लंड येथील विद्यापीठात संशोधनासाठी दोन महिन्यांपूर्वी निवड झाली आहे.
पासपोर्ट,संबधित देशाचा व्हिजा मिळाला असून दिलीप ५ जानेवारी २०२२ रोजी आर्यलँडला जाणार आहे. त्याचे पीएचडीचे संशोधन ४ वर्ष चालणार असल्याची माहिती त्याने मुंबई तक ला दिली आहे.
दिलीपचं कुटुंब हे शेतकरी कुटुंब आहे. दिलीपचे वडील हे मुळचे शेतकरी, त्यांची पाच एकर जमीन आहे. परंतू सततची नापिकी, दुष्काळ आणि अत्यल्प उत्पादन यामुळे दिलीपच्या वडिलांवर कर्जाचा मोठा डोंगर तयार झाला. त्यातच तिन्ही मुलींची लग्न करुन दिल्यामुळे दिलीपच्या कुटुंबाची परिस्थिती आणखीनच खालावली. दिलीपचा मोठा भाऊ हा एमपीएसची परीक्षा देत आहे. परंतू आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी वेळप्रसंगी खासगी सावकाराचं कर्ज काढलेल्या दिलीपच्या वडिलांच्या कष्टाचं या रुपाने चीज झाल्याची भावना पंचक्रोशीत बोलून दाखवली जात आहे.
ADVERTISEMENT