ज्यांच्या निधनाने अख्खं ब्रिटन शोकसागरात बुडालं ते प्रिन्स फिलिप कोण होते?

मुंबई तक

• 01:38 PM • 09 Apr 2021

ब्रिटनच्या राजघराण्याच्या महाराणी एलिझाबेथ (दुसऱ्या) यांचे पती प्रिन्स फिलिप यांचं आज सकाळी निधन झालं. वयाच्या 99 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी पसरताच संपूर्ण ब्रिटन शोकसागरात बुडालं आहे. जाणून घेऊया कोण होते प्रिन्स फिलिप? प्रिन्स फिलिप यांचा जन्म 10 जून 1921 रोजी कोर्फू या ग्रीक बेटावर झाला होता. त्यांचे वडील प्रिन्स अँड्यू […]

Mumbaitak
follow google news

ब्रिटनच्या राजघराण्याच्या महाराणी एलिझाबेथ (दुसऱ्या) यांचे पती प्रिन्स फिलिप यांचं आज सकाळी निधन झालं. वयाच्या 99 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी पसरताच संपूर्ण ब्रिटन शोकसागरात बुडालं आहे. जाणून घेऊया कोण होते प्रिन्स फिलिप?

हे वाचलं का?

प्रिन्स फिलिप यांचा जन्म 10 जून 1921 रोजी कोर्फू या ग्रीक बेटावर झाला होता. त्यांचे वडील प्रिन्स अँड्यू ऑफ ग्रीस अँड डेन्मार्क हे राजे जॉर्ज (पहिले) ऑफ हेलनेस यांचे कनिष्ठ पुत्र होते.

प्रिन्स फिलिप यांची आई अॅलिस लॉर्ड माऊंटबॅटन यांची मुलगी आणि राणी व्हिक्टोरिया यांची नात होत्या. याचाच अर्थ लॉर्ड माऊंटबॅटन हे प्रिन्स फिलिपचे आजोबा होते. फिलिप हे पॅरीसमध्ये लहानाचे मोठे झाले. त्यानंतर त्यांना इंग्लंडच्या प्रेप स्कूलमध्ये पाठवण्यात आलं. त्यानंतर त्यांनी गॉर्डनस्टोनच्या एका स्कॉटिश बोर्डिंग स्कूलमध्येही प्रवेश घेतला.

प्रिन्स फिलिप हे आपल्या आई वडिलांपासून जेव्हा वेगळे झाले तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांचा बहुतांश वेळ दक्षिण फ्रान्समध्ये घालवला. त्यांच्या आईला मनोविकार जडला होता. त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

जगाला दुसऱ्या महायुद्धाचे वेध लागले होते त्यावेळी प्रिन्स फिलिप यांनीही सैन्यदलात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यांना वायुसेनेत दाखल व्हायचं होतं. मात्र त्यांनी नौदलात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. फिलिप डार्टमाऊथमध्ये असलेल्या रॉयल नेव्हल कॉलेजमध्ये कॅडेट झाले. आपल्या महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळातच फिलिप यांची भेट एलिझाबेथ यांच्यासोबत झाली. एलिझाबेथ यांना पाहता क्षणी फिलिप त्यांच्या प्रेमात पडले होते.

1942 मध्ये फिलिप हे शाही नौदलात सेवा बजावत होते. या सगळ्या कालावधीत एलिझाबेथ आणि फिलिप यांच्यात चिठ्ठ्यांचं आदानप्रदान होऊ लागलं. त्यांची प्रेमकहाणी बहरू लागली होती त्याचंच हे प्रतीक होतं. फिलिप आणि एलिझाबेथ यांच्यात प्रेम फुलत होतं त्याचवेळी म्हणजे 1946 मध्ये त्यांनी एलिझाबेथ यांना लग्नासाठी विचारणा केली. फिलिप यांना एलिझाबेथ यांच्याशी लग्न करण्यासाठी नवं नाव आणि नव्या नागरिकत्वाची गरज होती. त्यामुळे त्यांनी ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारलं आणि माऊंटबॅटन हे नावही स्वीकारलं.

20 नोव्हेंबर 1947 ला फिलिप आणि एलिझाबेथ यांचा विवाहसोहळा पार पडला. हा विवाहसोहळा म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतरची एक सुखद सुरुवात आहे असं वक्तव्य त्यावेळी चर्चिल यांनी केलं होतं. लग्नानंतर पुन्हा नौदलाकडे वळलेल्या फिलिप यांना माल्टाला पाठवण्यात आलं होतं. शाही जोडप्याने 1948 मध्ये अपत्याला जन्म दिला. ज्यांचं नाव ठेवण्यात आलं चार्ल्स. तर 1950 मध्ये या दोघांनी मुलीला जन्म दिला तिचं नाव ठेवण्यात आलं एने.

फेब्रुवारी 1952 मध्ये फिलिप आणि एलिझाबेथ हे केनियामध्ये वास्तव्य करत होते. त्यावेळी किंग जॉर्ज (सहावे) यांचं निधन झालं. त्यावेळी एलिझाबेथ यांच्याकडे महाराणी हे पद आलं. एलिझाबेथ (दुसऱ्या) यांनी महाराणी म्हणून पद सांभाळताच एक शाही फर्मान काढलं, ज्यानुसार राणीनंतर म्हणजेच त्यांच्यानंतर सर्वात उच्च स्थान हे प्रिन्स फिलि यांचं असेल. मात्र प्रिन्स फिलिप यांना कोणतीही संविधानिक जबाबदारी देण्यात आली नव्हती.

फिलिप यांनी राज घराण्याला आधुनिक रूप देण्याचा पूर्ण प्रयत्न त्या काळात केला.. मात्र शाही घराण्याशी प्रामाणिक असणाऱ्यांनी त्यांच्या विचारांना कृतीत बदलू दिलं नाही. त्यानंतर साधारण 1956 च्या आसपास ते चार महिन्यांच्या सुट्टीवर गेले होते. त्यावेळी राणी एलिझाबेथ आणि प्रिन्स फिलिप यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्यावेळी पसरलेल्या या अफवा होत्या हे नंतर काळानेच दाखवून दिलं.

प्रिन्स फिलिप यांचं बालपण एकटेपणात गेलं होतं त्यामुळे ते अगदी कमी वयात स्वावलंबी झाले होते. युवकांसाठी चांगलं काम करण्याची त्यांची प्रबळ इच्छा होती. 1956 मध्ये ड्युक ऑफ एडिनबरा अवॉर्ड योजनेची घोषमा त्यांनी केली.. ज्यामुळे लाखो युवकांना आयुष्याकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन लाभला. या योजनेसाठी ते हयात असेपर्यंत कार्यरत होते. तसंच वन्य जीवांचं रक्षण झालं पाहिजे असंही त्यांचं धोरण होतं. मात्र 1961 ला जेव्हा ते भारताच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा एका चित्त्याची शिकार केल्याने त्यांच्यावर कठोर शब्दात टीका जगभरातून करण्यात आली होती. राजकुमार फिलिप यांना विविध प्रकारच्या खेळांमध्येही रूची होती.

त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्यांची धोरणं, त्यांचे विचार या सगळ्याची भुरळ ब्रिटनच्या युवकांना पडली होती. ब्रिटनमध्ये आजवर सर्वाधिक मान-सन्मान मिळालेल्या व्यक्तींमध्ये प्रिन्स फिलिप यांची गणना होते. त्यामुळेच या प्रिन्सना निरोप देताना सगळं ब्रिटन हळहळलं आहे.

    follow whatsapp