अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील राशीन येथे एका नामांकित डॉक्टराने आपल्या पत्नी आणि दोन्ही मुलांना विषारी इंजेक्शन देत नंतर स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डॉक्टरने आपल्या संपूर्ण कुटुंबाला संपवून नंतर स्वत:चं देखील आयुष्य संपविल्याची घटना उघडकीस आल्यानंतर नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
डॉ. महेंद्र थोरात असे डॉक्टरांचे नाव आहे. पत्नी वर्षा, थोरला मुलगा कृष्णा आणि धाकटा कैवल्य अशी कुटुंबातील इतरांची नावे आहेत. डॉ. महेंद्र थोरात हे गरिबांचे डॉक्टर म्हणून नगर जिल्ह्यात ओळखले जायचे. पण त्यांनी उचललेल्या टोकाच्या पावलामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
नेमकं काय घडलं?
शनिवारी पहाटे ही घटना घडली असल्याचं समजतं आहे. गळफास घेतलेल्या खोलीच्या दरवाजाला डॉक्टर थोरात यांनी एक चिठ्ठी चिटकवली होती. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या या चिठ्ठीत डॉक्टरने असं लिहलं होतं की, ‘माझा थोरला मुलगा कृष्णा याला कानाने ऐकण्यास कमी येत असल्याने त्याला मिळणाऱ्या वागणुकीमुळे आम्हाला समाजात अपराध्यासासारखे वाटत आहे. अनेक दिवसांपासून आम्ही व्यथित आहोत. कृष्णाचेही कशात मन लागत नाही. हे दु:ख आम्ही आई-वडील म्हणून सहन करू शकत नाही. म्हणून मी व माझी पत्नी वर्षा आत्महत्येसारखे कृत्य करत आहोत. हे योग्य नसले तरी नाईलाजावास्तव हे कृत्य करीत आहोत. यात कोणालाही जबाबदार धरू नये.’ दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच हॉस्पिटल परिसरात मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी या प्रकाराचा कसून तपास सुरु केला आहे.
ही बातमी वाचण्यासाठी क्लिक करा: अभिनेता संदिप नाहरची आत्महत्या, फेसबूकवर पोस्ट केली सुसाईड नोट
सामाजिक कामात अग्रेसर असलेले डॉक्टर एवढं टोकाचं पाऊल कसं काय उचलू शकतात असाच प्रश्न नगरवासियांना पडला आहे. गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून महेंद्र थोरात यांची ओळख होती. दवाखान्यात एखादा पेशंट आला आणि त्याच्याकडे पैसे नसल्यास महेंद्र थोरात हे स्वतः औषधा घेण्यासाठी रुग्णाला पैसे देऊ करायचे. रूग्णांबाबत एवढी तळमळ असणाऱ्या डॉक्टरांच्या आत्महत्येची बातमी समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकाराची पोलिसांनी रितसर नोंद केली असून याप्रकरणात ते अधिक तपास करत आहेत. तसेच यामागे काही घातपाताची शक्यता तर नाही ना? या दृष्टीने देखील पोलीस तपास करत आहेत.
ADVERTISEMENT