डोंबिवली : येथे रस्त्याने चालताना बाईकस्वार अंगावर थुंकल्याच्या रागातून झालेल्या हाणामारीत बाईकस्वाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विजय पाटवा असं मृत्यू इसमाचं नाव आहे. डोंबिवलीमधील राजूनगर परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी विष्णू नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पादचारी कैफ जावेद खान याला अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
याबाबत अधिक माहिती अशी की, डोंबिवली पश्चिमेकडील राजू नगर परिसरात शनिवारी दुपारी विजय पाटवा हे दुचाकीवरुन जात होते. यावेळी रस्त्याने चालणारा कैफ खान बाजूला थुंकला. ही थुंकी अंगावर उडाल्यानं विजय पाटवा यांनी कैफ याला जाब विचारला. त्यावरुनच दोघांमध्ये वाद सुरू झाला.
काही क्षणातच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. कैफ खान याने विजय पाटवा यांना लाथा – बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. काही वेळातच विजय पाटवा खाली पडून बेशुद्ध झाले. हाणामारीत त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
हा सर्व प्रकार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. प्रकरणी विष्णू नगर पोलीस ठाण्यात कैफ खान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे. कैफ याला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, किरकोळ कारणावरून सुरु झालेला वाद, त्यातून हाणामारी आणि मृत्यू हा सगळा प्रकार घडेपर्यंत पोलीस काय करत होते, असा सवाल विचारला जात आहे.
ADVERTISEMENT