किरण बेदींना पुदुच्चेरीच्या उपराज्यपालपदावरून हटवलं, हे आहे कारण

मुंबई तक

• 03:09 AM • 17 Feb 2021

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी किरण बेदी यांना पुदुच्चेरीच्या उपराज्यपाल पदावरून हटवलं. राष्ट्रपती भवनाने प्रसिद्धीपत्रक जारी करून यासंदर्भातली घोषणा केली. राष्ट्रपतींनी तेलंगनाच्या राज्यपाल डॉ. तमिलिसाई सुंदरराजन यांच्यावर पुदुच्चेरीच्या उपराज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलाय. राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, तेलंगनाच्या राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन तेलंगनासोबत आता पुदुच्चेरीच्या उपराज्यपाल म्हणूनही जबाबदारी पार पाडतील. नव्याने किंवा स्वतंत्र व्यक्तीची नियुक्ती […]

Mumbaitak
follow google news

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी किरण बेदी यांना पुदुच्चेरीच्या उपराज्यपाल पदावरून हटवलं. राष्ट्रपती भवनाने प्रसिद्धीपत्रक जारी करून यासंदर्भातली घोषणा केली. राष्ट्रपतींनी तेलंगनाच्या राज्यपाल डॉ. तमिलिसाई सुंदरराजन यांच्यावर पुदुच्चेरीच्या उपराज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलाय.

हे वाचलं का?

राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, तेलंगनाच्या राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन तेलंगनासोबत आता पुदुच्चेरीच्या उपराज्यपाल म्हणूनही जबाबदारी पार पाडतील. नव्याने किंवा स्वतंत्र व्यक्तीची नियुक्ती होईपर्यंत उपराज्यपाल पदाची जबाबदारी तमिलीसाई सुंदरराजन यांच्याकडेच राहील.

आयपीएस अधिकारी राहिलेल्या किरण बेदींना २९ मे २०१६ ला उपराज्यपाल म्हणून नेमण्यात आलं होतं. येत्या मे महिन्यात त्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार होता. पण उपराज्यपाल म्हणून नेमणूक झाल्यापासून किरण बेदी आणि सरकार यांच्यात वाद सुरू होते.

या वादातूनच गेल्या १० फेब्रुवारीलाच मुख्यमंत्री वी नारायणसामी यांनी थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. आणि किरण बेदी यांना परत बोलवून घेण्याची मागणी केली होती.

लोकांनी निवडून दिलेल्या सरकारला काम करण्यात उपराज्यपाल म्हणून किरण बेदी अडथळा आणत असल्याचा आरोप नारायणसामी यांनी केला होता. राष्ट्रपती आणि नारायण सामी यांच्यातही ही भेट अर्धा तास चालली होती.

राष्ट्रपतींच्या या निर्णयाचं पुदुच्चेरी काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी स्वागत केलंय. गुंडूराव यांच्या मते, किरण बेदी या भारताच्या इतिहासातल्या सर्वात वाईट एलजी राहिल्यात. एखाद्या हुकूमशहासारखं त्यांचं वर्तन राहिलंय. पुदुच्चेरीतल्या काँग्रेस सरकारला त्या काम करू देत नव्हत्या. त्यांचं कार्यालय म्हणजे भाजप, आरएसएसचं कार्यालय झालं होतं.

इथे नोंद करण्यासाठी गोष्ट म्हणजे, पुदुच्चेरीमध्ये चालू वर्षीच विधानसभेची निवडणूक आहे. आणि गेल्या काही दिवसांपासून केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुच्चेरीमधल्या राजकीय घडामोडींना वेग आलाय.

आगामी निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसच्या ४ आमदारांनी राजीनामा दिला होता. तर एका आमदाराची याआधीच पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत हकालपट्टी करण्यात आलीय. राजीनामा दिलेले हे आमदार लवकरच भाजपमध्ये सामील होणार असल्याचं म्हटलं जातंय.

त्यामुळे काँग्रेस सरकारचं बहुमत धोक्यात आलंय. विरोधी बाकावर बसलेल्या भाजपने बहुमत चाचणीची मागणी केलीय. पुदुच्चेरीमध्ये काँग्रेस आणि द्रमुक यांच्या आघाडीचं सरकार आहे. २०१६ मध्ये विधानसभेच्या ३० जागांसाठी निवडणूक झाली.

यात काँग्रेसला सर्वाधिक १५ जागा मिळाल्या होता. द्रमुकच्या ३ आणि एका अपक्ष आमदाराचा पाठिंबा मिळाला होता. पण आता सभागृहात काँग्रेस आमदारांची संख्या १० वर आलीय. विरोधी पक्षांत अद्रमुककडे ४, तर भाजपकडे उपराज्यपालनियुक्त ३ आमदार आहेत.

    follow whatsapp