नवी दिल्ली: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. पक्षाने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे. द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा करताना भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी यावेळी महिला आदिवासी व्यक्तीला संधी मिळावी यावर भर दिला.
ADVERTISEMENT
पत्रकार परिषदेत जेपी नड्डा म्हणाले की, ‘देश पहिल्यांदाच आदिवासी समाजातून राष्ट्रपती देण्याची तयारी करत आहे. यावेळी पूर्व भारतातील कोणाला तरी संधी देण्याचा सर्वांमध्ये सहमती झाली होती. आजवर देशाला आदिवासी महिला राष्ट्रपती मिळालेल्या नाहीत, याचाही विचार केला. अशा स्थितीत बैठकीनंतर द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.’
द्रौपदी मुर्मूने आपल्या आयुष्यात बराच काळ शिक्षिका म्हणून काम केले यावरही भाजप अध्यक्षांनी भर दिला. सर्वपल्ली राधाकृष्णन ज्या प्रकारे शैक्षणिक क्षेत्रात सतत सक्रिय होते त्याच प्रकारे द्रौपदी मुर्मू यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही द्रौपदी मुर्मू यांच्या नावाचे स्वागत केले आहे.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून असं म्हटलं आहे की, ‘द्रौपदी मुर्मूजींनी आपले जीवन गरीबांच्या सेवेसाठी समर्पित केले आहे. त्यांना अनेक वर्षांचा प्रशासकीय अनुभव आहे. मला खात्री आहे की, त्या एक महान राष्ट्रपती म्हणून सिद्ध होतील. त्यांच्या नावाची घोषणा करून पक्षाने एकीकडे आदिवासी समाजाला जोपासण्याचे काम केले आहे तर दुसरीकडे महिला सक्षमीकरणाचा संदेशही दिला आहे.’
राष्ट्रपती निवडणूक : भाजप की काँग्रेस… ममता बॅनर्जींमुळे कुणाची चिंता वाढणार?
द्रौपदी मुर्मूबद्दल सांगायचे तर, त्या देशातील पहिली आदिवासी राज्यपाल होत्या. 2015 ते 2021 पर्यंत त्या झारखंडच्या राज्यपाल होत्या. राज्यपालपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी द्रौपदी मुर्मू या भाजपच्या अनुसुचित जाती-जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या होत्या.
याशिवाय द्रौपदी मुर्मू यांनी आमदार म्हणून अप्रतिम काम केले आहे. 2007 मध्ये त्यांना नीळकंठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तेव्हा ओडिशा विधानसभेने त्यांना हा पुरस्कार प्रदान केला होता. अशा परिस्थितीत द्रौपदी मुर्म यांनी नेहमीच आपल्या कामाने सर्वांची मने जिंकली आहेत. हा पैलू लक्षात घेऊन एनडीएनेही त्यांचे नाव पुढे करण्याचा निर्णय घेतला आहे.
देशात राष्ट्रपती पदाची निवडणूक ही 18 जुलै रोजी होणार आहे. तर 21 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचना जारी होताच नावनोंदणीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 जून आहे.
ADVERTISEMENT