आर्थिक अडचणीमुळे चेन स्नॅचर बनलेल्या एका जिम ट्रेनला मुंबईतील MHB पोलिसांनी अटक केली आहे. समीर शिवाजी शेलार (वय ३२) असं या आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून २ चेन आणि २ मंगळसुत्र असा मुद्देमाल जप्त केला आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी समीरने काही दिवसांपूर्वी दहीसर पश्चिम भागातील मच्छी बाजारात एका महिलेची चेन खेचून पळ काढला होता. याव्यतिरीक्त समीरवर वसई रोड रेल्वे पोलिसांतही चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल आहे. आरोपी आपल्या पत्नीसोबत मालाड परिसरात रहायचा. तिकडे तो जिममध्ये ट्रेनिंगचं काम करायचा.
परंतू यानंतर पैशाच्या कमतरतेमुळे आरोपीने आपल्या पत्नीला घेऊन विरारला शिफ्ट होण्याचं ठरवलं. विरारमध्ये रहायला गेल्यानंतर समीरचं कामही हातातून सुटल्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज झालं. हे कर्ज फेडण्यासाठी आरोपीने चेन स्नॅचिंगचा मार्ग स्विकारला. आरोपी समीर कोणत्याही एका भागात जाऊन आपलं सावज हेरायचा.
सावज हेरल्यानंतर तो त्या महिलेचा पाठलाग करायचा. कमी गर्दीच्या ठिकाणी आल्यानंतर संधी साधून तो गळ्यातलं चेन किंवा मंगळसूत्र खेचून पळायचा. अखेरीस MHB पोलिसांनी सापळा रचत त्याला अटक केली आहे. याचसोबत आरोपी समीरने चोरलेला माल विकण्यासाठी मदत करणाऱ्या सूरज यादव या तरुणालाही पोलिसांनी अटक केली आहे.
ADVERTISEMENT