मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या मधील मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या कार्यक्रमात केलेलं वक्तव्य दिवसभर गाजतं आहे. भाजपचा भावी सहकारी असा केलेला उल्लेख हा सूचक आहे आणि त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. अशात आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थोडी जपून प्रतिक्रिया दिली आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी काय बोलावं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवारांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या मनात काय हे मी ओळखू शकत नाही पण माझ्याशी जेव्हा ते संवाद साधतात तेव्हा आपल्याला राज्याला पुढे घेऊन जायचं आहे असंच ते म्हणतात.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री काय म्हणाले?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवातीलाच भाजप नेते रावसाहेब दानवे यांना उद्देशून अप्रत्यक्षपणे ऑफर दिली. मुख्यमंत्री म्हणाले, ‘आज मंचावर उपस्थित आजी-माजी आणि एकत्रित आले, तर भावी सहकारी’, असं म्हणत युतीचे दरवाजे खुले असल्याचे एकप्रकारे संकेतच दिले. ‘एकमेकांकडून अपेक्षा असणारच. अपेक्षाशिवाय आयुष्य असूच शकत नाही. आम्ही तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करायच्या, तुम्ही आमच्या कडे व्यक्त करायच्या. पण रावसाहेब आज सर्वांच्यासमोर तुम्हाला शब्द देतो. जर तुम्ही मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी पुढाकार घेणार असाल, तर हे सरकार तुमच्यासोबत प्रत्येक पावलावर मजबुतीने उभे राहिल.’
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या याच वक्तव्याची चर्चा आज दिवसभर रंगली आहे. याबाबत अजित पवार यांना विचारलं असता त्यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय बोलावं ते आपण कसं सांगणार ते राज्याचे प्रमुख आहेत असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रीपदाच्या अर्ध्या अर्ध्या वाट्यावरून ठिणग्या उडाल्या. ज्याचं पर्यवसन युती तुटण्यात झालं. शिवसेनेला कोणतंही असं वचन दिलं गेलं नव्हतं असं भाजपने सांगितलं तर भाजपने वचन देऊन शब्द फिरवला हे शिवसेना म्हणत आली. त्यामुळे दोघांमध्ये अंतर पडलं आहे. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात सत्ता स्थापन केली. उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारमधे मुख्यमंत्री झाले. या सरकारला आता दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होईल अशात उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाजपचा उल्लेख भावी सहकारी असा करून युतीचे संकेत दिले आहेत. त्यावरून दिवसभर प्रतिक्रिया उमटत आहेत.
ADVERTISEMENT