महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने सहा हजार पानी चार्जशीट दाखल केलं आहे. मनी लॉड्रींग अर्थात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. त्यामुळे आधीच तुरुंगात असलेल्या अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.
ADVERTISEMENT
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी बुधवारी मुंबई पीएमएलए कोर्टात आरोपपत्र सादर केले. आरोपपत्र 6000 पानांचे असून आरोपपत्रात देशमुख यांचे नाव आरोपी म्हणून ठेवण्यात आले आहे. या खटल्यात देशमुख यांचं नाव प्रमुख आरोपी म्हणून असून त्यांची मुले हृषिकेश आणि सलील यांचीही आरोपी म्हणून नावे आहेत.
अनिल देशमुख हे नोव्हेंबर महिन्यापर्यंत तपास यंत्रणांच्या समोर आले नव्हते. 2 नोव्हेंबरला ते अचानक ईडीसमोर आले. ईडीने त्यांची सात तासांहून अधिक काळ चौकशी केली आणि त्यांना अटक केली. देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पालांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांच्याविरोधात ऑगस्ट महिन्यात पहिलं आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं.
मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटमधून खंडणी गोळा करून बडतर्फ सहाय्यक निरीक्षक सचिन वाझेने अनिल देशमुखाना 4.7 कोटी रुपये दिल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांना आढळले. या प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी वाझेचा जबाब दोनदा नोंदवला. अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआय एफआयआरनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सचिन वाझे आणि इतर काही पोलीस अधिकाऱ्यांना मुंबईत खंडणी म्हणून महिन्याला 100 कोटी रुपये उकळण्यास सांगितले होते हा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे. हा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीच उद्धव ठाकरेंना पत्र लिहून केला होता. सचिन वाझे आणि इतर काही अधिकाऱ्यांना अनिल देशमुख यांनी दर महिन्याला बार आणि रेस्तराँ यामधून शंभर कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं असं परमबीर यांनी म्हटलं होतं.
ईडीने मुंबई आणि नागपुरात अनेक ठिकाणी छापे टाकले होते आणि देशमुखांचे पीए आणि पीएस कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना जून महिन्यात ईडीने अटक केली होती. ईडी एसपी स्तरावरील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचारावरही नजर ठेवून आहे.या प्रकरणात 12 पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांनीही ईडीकडे त्यांचे जबाब नोंदवला आणि माजी मुख्य सचिव सीताराम कुंटेस यांचेही याप्रकरणी जबाब नोंदवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT