मुंबई : दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाच्या परवानगीवरुर शिवसेनेतील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आमने-सामने आला आहे. त्यामुळे हे प्रकरण कोर्टात जाण्याची शक्यता आहे. अशातच शिंदे गटने इतर मैदानांच्या पर्यायांची चाचपणी सुरु केली असल्याची माहिती मिळत आहे.
ADVERTISEMENT
शिंदे गटाकडून बीकेसीतील एमएमआरडीएम मैदान, सोमय्या मैदान आणि मेस्को मैदानाची चाचपणी सुरु केली आहे, अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. मात्र अद्यापही शिंदे गटाकडून शिवाजी पार्क मैदानासाठी करण्यात आलेला अर्ज माघारी घेण्यात आलेला नाही. त्यामुळे शिवाजी पार्कसाठी आता नेमकी कोणाला परवानगी मिळणार याची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे.
शिंदे गट म्हणू नका शिवसेना एकनाथ शिंदेंचीच- तानाजी सावंत
शिंदे गटाच्या भूमिकेकडे लक्ष
शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी शिवाजी पार्कवर होत असतो. मात्र कोरोना काळात तो होऊ शकला नव्हता. दरम्यान, शिवसेनेत फूट पडून शिंदे गट निर्माण झाला आहे. शिंदे गटाकडून बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा पुढे नेत असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे दसऱ्या मेळाव्यासाठीही शिंदे गटाकडून अर्ज करण्यात आला आहे.
शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याबद्दल अद्याप स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. दसरा मेळाव्याबद्दल एकनाथ शिंदे ठरवतील असं शिंदे गटाकडून सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे दसरा मेळावा अजून लांब असून, नंतर भूमिका स्पष्ट करू असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. त्यामुळे यंदाच्या दसऱ्याला मेळाव्यावरून शिमगा होण्याची शक्यता दिसत आहे.
उद्धव ठाकरेंची साथ सोडावी हे वाटणारा ट्रिगर पॉईंट कुठला होता? मुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर, म्हणाले..
शिवाजी पार्कवर शिवसेनेचाच दसरा मेळावा होणार -उद्धव ठाकरे
दरम्यान, शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासंदर्भात शिवसेनेकडून महापालिका प्रशासनाला पत्र देण्यात आली आहेत. मात्र, यावरील निर्णय अजून बीएमसी प्रशासनाने घेतलेला नाही. गणेशोत्सवानंतर निर्णय घेतला जाईल, असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
दुसरीकडे महापालिकेकडून परवानगी मिळाली नसली, तरी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होईल, असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर कुणाचा दसरा मेळावा होणार आणि मुंबईत शिवसेने व्यतिरिक्त आणखी कोण दसरा मेळावा घेणार, या प्रश्नांची उत्तर येत्या ५ ऑक्टोबरला मिळणार आहेत.
ADVERTISEMENT